‘बोरीबाऱ्हा’च्या पुनर्वसनाचा प्रश्न खितपत

By Admin | Updated: October 16, 2015 02:58 IST2015-10-16T02:58:19+5:302015-10-16T02:58:19+5:30

तलाव फुटण्याच्या भीतीने लगतचे बोरीबाऱ्हा हे गाव विस्थापित झाले. येथील नागरिकांना गत दोन वर्षांपासून जंगलात झोपडीवजा घरे बांधून जीवन कंठावे लागत आहे.

The question of rehabilitation of 'Bori Bara' is raised | ‘बोरीबाऱ्हा’च्या पुनर्वसनाचा प्रश्न खितपत

‘बोरीबाऱ्हा’च्या पुनर्वसनाचा प्रश्न खितपत

जंगलातील झोपड्यांत राहतात ग्रामस्थ : वीज, पाणी, रस्ता आदी मूलभूत सुविधांचाही अभाव
सचिन देवतळे विरूळ (आ.)
तलाव फुटण्याच्या भीतीने लगतचे बोरीबाऱ्हा हे गाव विस्थापित झाले. येथील नागरिकांना गत दोन वर्षांपासून जंगलात झोपडीवजा घरे बांधून जीवन कंठावे लागत आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांसह वन्य जीवांच्या धास्तीत ही कुटुंबे राहत आहे. शासन, प्रशासनाकडे निवेदने देऊनही उपयोग होत नसल्याने न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत ग्रामस्थांना मुलभूत सुविधा पुरवाव्या, अशी मागणी होत आहे.
शासन, प्रशासनाच्या नजरेतून हरविलेले एक दुर्दैवी गाव म्हणूनच सध्या बोरीबाऱ्हा गावाचा उल्लेख होऊ लागला आहे. गत दोन वर्षांपासून येथील काही ग्रामस्थ जंगलात ठोकलेल्या झोपडीमध्येच वास्तव्यास आहे. या ग्रामस्थांना अधिकारी मुर्ख बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपले गाव सोडले. तेव्हापासून त्यांना शासनाची कुठलीही मदत प्राप्त झाली नाही. बाऱ्हा येथील कुटुंबाचे पुनर्वसन न केल्याने त्यांना अंधाऱ्या रात्री सरपटणाऱ्या प्राण्यांच्या सानिध्यात चिमुकल्यांसह जगावे लागत आहे.
बोरीबाऱ्हा या गावात कोलाम आदिवासी बांधवांची वस्ती आहे. मोलमजुरी करून येथील नागरिक आपल्या संसाराचा गाडा हाकतात. बाऱ्हा गावाला लागून एक मोठा तलाव आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी हा तलाव तुडूंब भरला होता. तलाव फुटण्याच्या भीतीने प्रशासनाने बाऱ्हा येथील कुटुंबांचे स्थलांतरन करून एका शेतात पाल टाकून त्यांची निवासाची तात्पुरती व्यवस्था केली; पण कुठल्याही मुलभूत सोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. यामुळे पावसाळ्यातही ग्रामस्थांना जंगलातच दिवस काढावे लागत आहे. या ठिकाणी कोणत्याही शासकीय योजना पोहोचल्या नाही. काही दिवसांनी काहीच व्यवस्था नसल्याने काही ग्रामस्था परत आपल्या गावी राहायला गेले; पण काही कुटुंब अजूनही या जंगलात पाल टाकून वास्तव्यास आहेत. दोन वर्षांपासून हे गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. अद्याप साधी वीजही येथे पोहोचली नाही. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. उर्वरित कुटुंबेही पावसाळा सुरू झाला की, याच शेतात राहायला येतात.
सध्या हे गाव पूर्णपणे भकास झाले आहे. गावात कुठल्याही सुविधा नाहीत. कित्येक वर्षांपासून येथील ग्रामस्थांनी बोरीबाऱ्हा ते विरूळ या रस्त्याची मागणी केली; पण स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांची रस्त्याची मागणीही पूर्ण होऊ शकली नाही. विरूळ हे बाजाराचे ठिकाण असल्याने त्यांना नेहमीच येथे ये-जा करावी लागते. पावसाळ्यात कंबरभर पाण्यातून दोन किमीचा प्रवास करावा लागतो. राहायला घर नाही, वहिवाटीसाठी रस्ता नाही, रोगराई पसरल्यावर डॉक्टर नाही. यामुळे विरूळ वा पुलगाव येथे बैलबंडीने दवाखान्यात न्यावे लागते. अतिवृष्टी झाल्यास घरांना ओल चढते. यामुळे आजार पसरतात व वैद्यकीय सेवेसाठी भटकंती करावी लागते. येथील नागरिकांच्या हाताला काम नाही. दोन वेळच्या जेवणाचा प्रश्नही गंभीर आहे. पीक नाही, घरी लग्नाच्या मुली आहे; पण प्रशासन त्याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचेच दिसते. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे.

Web Title: The question of rehabilitation of 'Bori Bara' is raised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.