पुलगाव रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न सुटला
By Admin | Updated: September 18, 2014 00:02 IST2014-09-18T00:02:57+5:302014-09-18T00:02:57+5:30
मुंबई हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव कडून आर्वीकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे गेट वारंवार बंद राहत असल्यामुळे वाहनांना तासनतास ताटकळत राहावे लागत होते. मागील दोन दशकापासून येथे उड्डाणपूल व्हावा

पुलगाव रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न सुटला
प्रभाकर शहाकार - पुलगाव
मुंबई हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव कडून आर्वीकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे गेट वारंवार बंद राहत असल्यामुळे वाहनांना तासनतास ताटकळत राहावे लागत होते. मागील दोन दशकापासून येथे उड्डाणपूल व्हावा अशी मागणी प्रवासी व नागरिकांमधून केली जात होती. परंतु उड्डाणपुलाची जागा निश्चित होत नसल्याने हा प्रलंबित होता. पण आता हा प्रश्न निकाली लागला असून येत्या दोन वर्षात हा उड्डाणपूल तयार होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता नरेंद्र बोरकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
या उड्डाणपुलामुळे शहरातील बाजारपेठेवर संक्रांत येण्याच्या भीतीमुळे या पुलाच्या कामास बराच विरोध झाला. त्यामुळे या पुलाची जागा निश्चित होत नव्हती. काही पर्यायही सुचविण्यात आले होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या पुलाच्या जागेविषयी व त्यामुळे व्यापार संकुलाचे होणारे नुकसान लक्षात घेता कॉटन मील व बस आगाराच्या मधून हा मार्ग काढून रेल्वे गेटच्या जागेवर हा उड्डाण पूल होण्याचे संकेत मिळाले आहे. बस आगाराजवळून हा मार्ग पंचधारा रोड व पुढे नागपूर मुंबई द्रुतगती मार्गाला जोडल्या जाणार आहे. या भव्य पुलावर एकूण ४५ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून त्यापैकी राज्यशासनाचा वाटा ३५ कोटीचा तर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचा १० कोटीचा वाटा राहणार आहे.
या बांधकामास राज्य शासनाने नियोजन प्रकरण क्र. ६७९ नियोजन ३ दि. २७ मे २०१४ पुरवणी अर्थ संकल्पात नव्याने समाविष्ठ करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या निधीची तरतुद केली आहे. राज्यशासनासह रेल्वे मंत्रालयानेही या पुलाच्या नकाशासही मान्यता दिली आहे. पुलाच्या बांधकामाच्या निविदा ही काढण्यात आल्या असून हा उड्डाणपूल जवळपास दोन ते अडीच वर्षात पूर्ण केल्या जाईल अशी माहितीही बोरकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.