विरूळच्या पाणी पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह

By Admin | Updated: May 18, 2017 00:33 IST2017-05-18T00:33:18+5:302017-05-18T00:33:18+5:30

नागरिकांना पिण्याकरिता स्वच्छ पाणी मिळावे या हेतुने १५ वर्षांपूर्वी येथे जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली.

Question mark on viral water supply | विरूळच्या पाणी पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह

विरूळच्या पाणी पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह

लाखोंंचा खर्च व्यर्थ : ग्रामस्थांना दूषित पाणी पुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/विरूळ (आकाजी) : नागरिकांना पिण्याकरिता स्वच्छ पाणी मिळावे या हेतुने १५ वर्षांपूर्वी येथे जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली. याकरिता शासनाने लाखो रुपये खर्च केले. मात्र येथील जलशुद्धीकरण केंद्र गत दहा वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे येथील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असून ग्रामपंचायत प्रशासनाचा ढिसाळ कारभार याला कारणीभूत ठरल्याचे दिसते.
विरुळ या एकाच गावासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले होते. पाच वर्ष सदर केंद्र सुरळीत चालले. यानंतर जलशुद्धीकरण केंद्र बंद स्थितीत आहे. १५ वर्षांपूर्वी दिवंगत खासदार प्रभा राव यांच्या प्रयत्नातून येथे जलशुद्धीकरण केंद्र निर्मितीचा प्रस्ताव मान्य झाला. याकरिता लागणारा लाखो रुपयाचा निधी त्यांनी मिळवुन दिला होता. त्यावेळी जलशुद्धीकरण केंद्र आणि वर्धा नदीवरुन गावाला पाणीपुरवठा अशा दोन महत्वकांक्षी योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे येथील ग्रामस्थांना शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा होण्याची हमी मिळाली. त्यामुळे ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण होते.
यानंतर या दोन्ही योजना काही वर्ष सुरळीत चालल्या. प्रशासनाकडे असलेला नियोजनाचा अभाव या योजना बंद पडण्यास कारणीभूत ठरला. लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र दहा वर्षांपासून भंगार अवस्थेत पडुन आहे. तसेच या केंद्राला वर्धा नदीवरुन होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे.
विरुळ वासीयांना उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ सोसावी लागते. ग्रामपंचायतने पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर खोदली असली तरी ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नाही. पावसाळ्यात तर नागरिकांना अशुध्द पाणी पिण्यात आल्याने जलजन्य आजार उद्भवतात. गावात जलशुद्धीकरण केंद्र असताना नागरिकांना अशुध्द पाणी प्यावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य नियोजन करुन येथील जलशुद्धीकरण सुरू करण्याची मागणी आहे. या केंद्राची देखभाल दुरुस्ती नसल्याने येथील साहित्य चोरुन नेले आहे. जलशुध्दीकरण केंद्राची इमारत दहा वर्षांपासून बंद स्थितीत असल्याने खंडर झाले आहे. नागरिकांना स्वच्छ व शुध्द पाणी मिळावे याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

जलशुद्धीकरण केंद्र दहा वर्षांपासून बंद
विजेचे लाखो रुपयाचे देयक थकीत असल्याने तसेच तांत्रिक बाबीमुळे येथील जलशुध्दीकरण केंद्र दहा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. येथील ग्रामपंचायतने पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर बांधली असून येथून ग्रामस्थांना पाणीपुरवठा होतो. मात्र उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ येथील ग्रामस्थांना सोसावी लागते. ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी लाखो रुपये खर्च करुन बांधलेले जलशुध्दीकरण केंद्र बंद असल्याने ग्रामस्थांना अशुध्द पाणी प्यावे लागते.

Web Title: Question mark on viral water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.