गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाचा शिक्षकच वारसा व्हावा
By Admin | Updated: February 22, 2015 01:55 IST2015-02-22T01:55:45+5:302015-02-22T01:55:45+5:30
केवळ शिक्षक, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, त्यांचे वेतन व भत्ते, सेवा सुरक्षा आदींकरिता अधिवेशने घेऊन समारंभ साजरे करण्यापेक्षा यापूढे जाऊन शिक्षणाच्या सर्व बाबीवर

गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाचा शिक्षकच वारसा व्हावा
हिंगणघाट : केवळ शिक्षक, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, त्यांचे वेतन व भत्ते, सेवा सुरक्षा आदींकरिता अधिवेशने घेऊन समारंभ साजरे करण्यापेक्षा यापूढे जाऊन शिक्षणाच्या सर्व बाबीवर सर्वंकष चर्चा झाली पाहिजे. समाजातील सर्व घटकापर्यंत शिक्षणाविषयी चेतना निर्माण झाली पाहिजे. वैयक्तिक प्रश्नाबरोबर कौटुंबिक, सामाजिक जाणीव निर्माण होणे, ही आजची गरज आहे. यासाठी शैक्षणिक व सामाजिक उत्थानाचा मार्ग असलेले गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण वारसा रूपाने भावी पिढीला प्रदान करणे हे शिक्षकांचे नैतिक कर्तव्य आहे. नव्हे तर गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षणाचा शिक्षकच वारसा व्हावे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ यशवंत मनोहर यांनी केले़
प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाच्यावतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी राजे यांच्या जयंतीदिनी गुरूवारी स्थानिक कलोडे सभागृहात पाचची शिक्षण हक्क परिषद घेण्यात आली़ यावेळी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते़
डॉ. यशवंत मनोहर पूढे म्हणाले की, परिघ आणि परिघाबाहेरील लोकांना शिक्षण नाकारण्याचेच डावपेच आज आखले जात आहेत़ त्याची कटाक्षाने अंमलबजावणी केली जात आहे. गोर-गरिबांच्या वस्त्यांकडे धावणारे शिक्षणाचे ओघ अडविले व आटवले जात आहे. सरंमजामदार व भांडवलदारांच्या तालावर आणि त्यांच्या हितसंबंधीच्या ठेक्यावर थिरकणारे शासनही खासगीकरणाच्या नावाखाली गरिबांना शिक्षणाच्या परिघाबाहेर ढकलायला लागले. गुणवत्ता व बुद्धीमत्ता असणाऱ्यासंचे शिक्षण नाही तर ज्यांच्याकडे पैसा त्यांचे शिक्षण, असे धनदांडग्यांना म्हणजे शिक्षकांच्या हिताचे समिकरण झाले आहे़ गोर-गरिबांना मेहनतीच्या वा बुद्धीच्या स्पर्धेत उतरता येईल; पण त्यांना पैशाच्या स्पर्धेत टिकता येणे अवघड आहे. यामुळे आज सरंमजामदार व भांडवलदारांच्या बळावर राजकारण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी शिक्षण महाग केले. शिक्षण ही क्रांतीकारी शक्ती गरीबांपर्यंत पोहोचू नये, गोरगरिबांच्या मुक्त होण्याच्या वाटाच आज उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले़
परिषदेला चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागभिड, ब्रह्मपूरी, कोरपना येथील शेकडो शिक्षक, कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)