कव्वाली व सुफीगीतांची जुगलबंदी रंगली
By Admin | Updated: September 6, 2014 02:17 IST2014-09-06T02:17:06+5:302014-09-06T02:17:06+5:30
आपल्या सुरांची जादू पसरवित गायक-गायिकांनी परस्परांना दिलेले सुरेल आव्हान, वादक कलावंतांची सुमधूर साथ व निवेदकांनी शायराना लकबीत घेतलेली...

कव्वाली व सुफीगीतांची जुगलबंदी रंगली
वर्धा : आपल्या सुरांची जादू पसरवित गायक-गायिकांनी परस्परांना दिलेले सुरेल आव्हान, वादक कलावंतांची सुमधूर साथ व निवेदकांनी शायराना लकबीत घेतलेली एकमेकांची फिरकी, अशा वातावरणातील संपूर्ण सभागृहाला वेळेचे व वयाचे भान विसरायला लावणाऱ्या अनोख्या मैफलीने संगीतप्रेमींना जिंकले़ निमित्त होते, दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठद्वारे सावंगी (मेघे) येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात सादर झालेल्या कव्वाली व सुफी गीतांच्या जुगलबंदीचे!
रिद्धी-सिद्धी सांस्कृतिक मंचाद्वारे सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुंबईकर कव्वाल व नागपूर येथील सुफीयाना मिजाज जोपासणाऱ्या कलावंतांच्या संचामध्ये ही सुरेल जुगलबंदी रंगली. या कार्यक्रमात आलोक कटधरे, अलिसिया शेट्टी, सूरज शर्मा (मुंबई) आणि सुरभी ढोमणे, मोहम्मद शहाजीद, मंगेश वानखेडे (नागपूर) या गायकांनी गायकीचे दोन भिन्न प्रवाह सादर करीत अखेर मानवता हाच आमचा खरा धर्म आहे, यावर मोहोर उमटविली. तेरी दिवानी, इश्क सुफियाना, अल्लाहूं, हम तेरे बिन, ताकते रहते तुझको, अली मोरे अंगना, चढता सुरज धिरे-^^धिरे, निगाहे मिलाने को, तेरी महफील में, वादा तेरा वादा, झुम बराबर झुम, शिर्डीवाले साईबाबा, दमा दम मस्त कलंदर आदी एकापेक्षा एक लोकप्रिय गाणी सदर करीत रसिकांना भूरळ घातली़ संपूर्ण कार्यक्रमाचे संगीत नियोजन सचिन ढोमणे यांनी केले होते. गायकांना महेंद्र ढोले (आॅर्गन), अमर शेंडे (व्हॉयोलिन), प्रसन्न वानखेडे (गिटार), सचिन ढोमणे (तबला), बंडू गोहणे (आॅक्टोपॅड), दीपक कांबळे (ढोलक) व विक्रम जोशी (ताल वाद्य) यांनी संगीतसाथ केली. परस्परांना सवाल-जबाब करीत सूत्रसंचालक निसार खान व श्वेता शेलगावकर यांनी अखेरपर्यंत ही जुगलबंदी रंगतदार ठेवली. कार्यक्रमास साजेसे नृत्याविष्कारही सादर झालेत़
प्रारंभी दिनेश मिश्रा व गायक, वादक कलावंतांचा कुलपती दत्ता मेघे व मुख्य समन्वयक डॉ. एस.एस. पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्ह्यातील कलाप्रेमी रसिकांची भरगच्च उपस्थिती लाभली होती.(कार्यालय प्रतिनिधी)