लोकमत न्यूज नेटवर्क अल्लीपूर : नजीकच्या मनसावळी येथील हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, दारू विक्रेत्या पुष्पा किन्नाके, रा. मनसावळी आणि वसीम कुरेशी, रा. अल्लीपूर या दोघांनी संगनमत करूनच वैभव अरुण खडसे याची हत्या केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने नागपूर येथील नंदनवन परिसरातून ताब्यात घेत अटक केली.मनसावळी येथील पुष्पा किन्नाके हिच्या कुलूपबंद घरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी अल्लीपूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने मनसावळी गाठून पुष्पाच्या घराची पाहणी केली. याच पाहणीत पुष्पाच्या घरात कुजलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नाअंती मृतकाची ओळख पटली. पुष्पाच्या घरी नेहमी येणारा वैभव खडसे, रा. यवतमाळ याचा हा मृतदेह असल्याचे लक्षात येताच पोलिसांनीही आपल्या हालचालींना गती दिली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेसह अल्लीपूर पोलिसांनी तपासाला गती देत पुष्पा किन्नाके व वसीम कुरेशी या दोघांना नागपूर शहरातील नंदनवन परिसरातून ताब्यात घेतले. प्राथमिक विचारपूसदरम्यान या दोघांनीही संगनमत करून वैभव याच्यावर तलवारीने प्रहार करून त्याची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.
घटनेनंतर दोन्ही आरोपी झाले होते पसार- संगनमत करून तलवारीने जबर प्रहार करीत वैभव खडसे याची हत्या केल्यावर मनसावळी येथील दारू विक्रेता पुष्पा किन्नाके आणि अल्लीपूर येथील वसीम कुरेशी हे दोघेही पुष्पाच्या घराला कुलूप लावून पसार झाले होते. - पोलिसांच्या हाती आपण लागणार नाही असे काहीसे म्हणत या दोघांनीही नागपूर गाठले; पण पोलिसांनीही तपासाची चक्र फिरवीत या दोघांना हुडकून काढत अटक केली आहे.
जिल्हा रुग्णालयात झाले शवविच्छेदन- कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या वैभवच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली. डॉ. चकोर रोकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैभवच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले.
आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी- या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अल्लीपूर पोलिसांनी रविवारी न्यायालयात हजर करून त्यांची २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे. पोलीस कोठडीदरम्यान काय नवे पुढे येते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.