पणन महासंघाची खरेदी केवळ १४ क्विंटल
By Admin | Updated: November 18, 2015 02:05 IST2015-11-18T02:05:55+5:302015-11-18T02:05:55+5:30
बाजारात कापसाची आवक वाढली असल्याने व्यापाऱ्यांकडून दर्जाचे कारण काढत कापसाला अत्यल्प दर दिला जात आहे.

पणन महासंघाची खरेदी केवळ १४ क्विंटल
महासंघाकडे कापूस उत्पादकांची पाठ : सीसीआयच्या केंद्रांकडे सर्वांच्या नजरा
रूपेश खैरी वर्धा
बाजारात कापसाची आवक वाढली असल्याने व्यापाऱ्यांकडून दर्जाचे कारण काढत कापसाला अत्यल्प दर दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना शासकीय खरेदीची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या पणन महासंघाच्या एकमेव केंद्रावर आतापर्यंत केवळ १४ क्विंटल कापसाची खरेदी झाली. महासंघाच्या केंद्रांकडे कापूस उत्पादकांनी पाठ फिरविली असून त्यांच्या नजरा सीसीआयच्या खरेदीकडे लागल्या आहेत.
जिल्ह्यात दिवाळीपूर्वी तळेगाव (श्यामजी पंत) येथील एका जिनिंगवर पणन महासंघाची खरेदी सुरू झाली. या खरेदीचा मुहूर्त शुक्रवारी (६ नोव्हेंबर) करण्यात आला होता. याला दहा दिवसांचा कालावधी झाला असताना येथे आतापर्यंत केवळ १४ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. सुरू करण्यात आलेले कापूस केंद्र जिल्ह्याच्या एका टोकावर आहे, शिवाय संकलन केंद्र असलेला भाग फळ उत्पादकांचा आहे. यामुळे येथे कापसाची आवक झाली नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे जिल्ह्यात सुरू झालेले पणन महासंघाचे एकमेव केंद्र खासगी व्यापाऱ्यांच्या पथ्यावर पडत असल्याचे दिसून येत आहे.
देवळी तालुक्यात सीसीआयचे एक केंद्र सुरू झाले आहे. येथे येणाऱ्या कापसाच्या आवकीनुसार इतर केंद्र सुरू करण्याची भूमिका सीसीआयने घेतल्याची माहिती आहे. सीसीआयच्यावतीने येत्या काही दिवसांत पाच केंद्र सुरू करण्याची तयारी सुरू आहे. सीसीआयच्या केंद्रानंतर पणन महासंघाचे केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
शेतकऱ्यांचा कापूस शेतातून बाजारात येण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे बाजारात कापसाची आवक वाढल्याने व्यापाऱ्यांकडून दर पाडले जात असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे कापूस आणणे सोईचे ठरेल, अशा ठिकाणी शासकीय कापूस खरेदीचे केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. हमीभाव ४ हजार १०० रुपये असताना वर्धेत व्यापाऱ्यांकडून ३ हजार ८०० रुपयांत कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे.
कापसाची शासकीय खरेदी सुरू झाल्यास शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे पणन महासंघाने कापसाची आवक असलेल्या ठिकाणी कापूस संकलन केंद्र सुरू करणे गरजेचे झाले आहे.
पणन महासंघाचे एकमेव केंद्र व्यापाऱ्यांच्या पथ्यावर
पणन महासंघाने वर्धा जिल्ह्यात तळेगाव (श्यामजी पंत) येथे एकमेव केंद्र सुरू केले आहे. शासकीय खरेदी सुरू असलेले हे एकमेव केंद्र जिल्ह्याच्या एका कोपऱ्यावर आहे. शिवाय केंद्र असलेला भाग कापूस उत्पादकांचा नाही तर फळ उत्पादकांचा असल्याने ते केेंद्र कापूस खरेदी करणाऱ्या खासगी व्यापाऱ्यांच्या पथ्यावर पडणारे आहे. या केंद्रात कापसाची आवक होत नसल्याचे कारण काढत जिल्ह्यात कापूस संकलन केंद्र सुरू करावे अथवा नाही, या विचारात पणन महासंघ असल्याची माहिती आहे.
वर्धेतील कार्यालयही बंद
शेतातील कापूस बाजारात येण्यास प्रारंभ झाला आहे. प्रारंभी व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा वाढीव दर मिळत होता. आता मात्र त्यांच्याकडून कापसाच्या दर्जाचे कारण काढत अत्यल्प दरात कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. या दिवसांत शेतकऱ्यांच्या पाठीशी शासकीय यंत्रणा म्हणून पणन महासंघाने उभे राहणे गरजेचे असताना वर्धेतील महासंघाच्या कार्यालयालाच टाळे लागले आहे. शासकीय कापूस खरेदीची धुरा सांभाळणारा पणन महासंघ तसाही उपयोगाचा नसल्याचेच अनेक दिवसांपासून पुढे आले आहे. यामुळे आता हे कार्यालय कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याच्या हालाचाली सुरू असल्याची माहिती आहे. येथे असलेल्या एकमेव कर्मचाऱ्याला दुसऱ्या जिल्ह्यात कर्तव्यावर पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात आले.