पुणे-काजीपेठ एक्सप्रेस पुलगाव स्थानकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 23:09 IST2017-10-21T23:09:35+5:302017-10-21T23:09:47+5:30
गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रवासी मागणीला प्रतिसाद देत पुणे- काजीपेठ ही सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू झाली.

पुणे-काजीपेठ एक्सप्रेस पुलगाव स्थानकावर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रवासी मागणीला प्रतिसाद देत पुणे- काजीपेठ ही सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू झाली. ही गाडी शनिवारी सकाळी ११.३० वाजता पुलगाव स्थानकावर पोहोचताच खा. रामदास तडस, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मिलिंद भेंडे, नगराध्यक्ष शीतल संजय गाते, भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे यांच्या उपस्थितीत फटाके फोडून स्वागत करण्यात आले. याच वेळी खा. तडस व मिलिंद भेंडे हे दोघे सामान्य श्रेणीच्या डब्यातून तिकीट घेवून प्रवास करणारे प्रथम प्रवाशी ठरले.
यावेळी गाडीचे मुख्य चालक कैलाश एस. काळबांडे, सहायक चालक मिलिंद चोखांदे यांचा खा. तडस यांनी शाल श्रीफळ देवून सत्कार केला. तसेच प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्याच्या दृष्टीने तिकीट काढून सामान्य श्रेणीच्या डब्यातून वर्धेपर्यंत प्रवास केला. या सुपर फास्ट ट्रेनमुळे बडनेरा ते वर्धा पर्यंतच्या प्रवाशांना हिंगणघाट, चंद्रपूर, बल्लारशाह काजीपेठकडे जाणे सोयीचे झाले आहे. सध्या ही साप्ताहिक ट्रेन असली तरी काही दिवसातच ही आठवड्यातून तीन दिवस व त्यानंतर दररोज धावणार असल्याचे खा. तडस यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या गाडीचा परतीचा प्रवास रविवारी २ काजीपेठ स्टेशनहून दुपारी १.३५ ला सुटून रात्री ८.३० वाजता पुलगाव स्थानकावर पोहचेल.
याप्रसंगी रेल्वे स्थानकावर न.प. उपाध्यक्ष आशीष गांधी, भाजपा ओबीसी मंडळाचे प्रांतीय सरचिटणीस संजय गाते, भाजपा जिल्हा सचिव नितीन बडगे, श्रवण तिवारी, मानसिंग झांझोटे, जिल्हा उपाध्यक्ष राजीव बत्रा, श्रवण मंडले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.