गरिबांच्या घरात शिजणार डाळ
By Admin | Updated: August 14, 2016 00:09 IST2016-08-14T00:09:28+5:302016-08-14T00:09:28+5:30
तुरीची डाळ महागल्याने गोरगरीब कुटुंबांच्या जेवणातून वरण हद्दपार झाले होते. १५० ते २०० रुपये किलोवर...

गरिबांच्या घरात शिजणार डाळ
जिल्ह्यातील नऊ गोदामात तूर डाळ : बीपीएल, अंत्योदय कार्डधारकांना मिळणार लाभ
गौरव देशमुख वर्धा
तुरीची डाळ महागल्याने गोरगरीब कुटुंबांच्या जेवणातून वरण हद्दपार झाले होते. १५० ते २०० रुपये किलोवर तूर डाळीचे भाव गेल्याने सामान्य नागरिकांना ते परवडेणासे झाले होते. तूर डाळीच्या भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या. शिवाय गोरगरीबांना तूर डाळ घेता यावी म्हणून स्वस्त धान्य दुकानांमध्ये तूर डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. चालू आॅगस्ट महिन्यापासून कंंट्रोलमध्ये तूर डाळ उपलब्ध करून दिली असून आता गरीबांच्या घरातही डाळ शिजणार आहे.
तुरीची डाळ महागल्यााने गरीबांना वरण शिजविणे कठीण झाले होते. लहान मुलांना तर वरणाचे पाणी खाऊ घालण्यासाठीही विचार करावा लागत होता. याबाबत राज्यात सर्वत्र ओरड झाल्याने शासनाने हस्तक्षेप केला. तूर डाळ आणि तुरीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले. साठेबाजांवर कार्यवाहीचा बडगा उगारण्यात आला. शिवाय अन्य उपाययोजनाही करण्यात आल्या. यामुळे खुल्या बाजारातील तूर डाळीचे भाव काही प्रमाणात नियंत्रणात आले. असे असले तरी हातावर आणून पानावर खाणाऱ्यांना तूर डाळ खरेदी करणे शक्य नव्हते. गरीबांना स्वस्त धान्य दुकानातून तूर डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानुसार १०३ रुपये किलोप्रमाणे आॅगस्ट महिन्यापासून तूर डाळ मिळणार आहे. याचा लाभ ९१ हजार ८ बीपीएल व अंत्योदय कार्ड धारकांना मिळणार आहे. जिल्ह्यातील नऊ गोदामांत तूर डाळ पोहोचली आहे. ही डाळ ४७ हजार ७६९ बीपीएल व ४३ हजार २३९ अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रतिधारक एक किलो याप्रमाणे वितरित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
काळा बाजार होण्याची भीती
स्वस्त धान्य दुकानदार माल आला नाही, माल कमी मिळाला, पुढच्या महिन्यात येईल, ट्रॅफिकमुळे माल रस्त्यातच आहे, अशी विविध कारणे लाभार्थ्यांना सांगतात. स्वस्त धान्य दुकानदार स्वस्त भावात धान्य देत असल्याने तो म्हणतो ते खरे समजणारेही अनेक आहेत. जे तक्रार करू शकतात, त्यांना मात्र दुकानदारामार्फत त्वरित धान्य पुरवठा केला जातो. यामुळे डाळ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली की नाही, याची माहिती करून त्याची विक्री होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रती महिना एक किलो तूरडाळ मिळणार आहे.