औद्योगिक वसाहतीपासून पुलगावकर वंचितच
By Admin | Updated: May 22, 2016 01:52 IST2016-05-22T01:52:34+5:302016-05-22T01:52:34+5:30
मुंबई, कोलकाता या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर बसलेले शहर गत पाच दशकांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे.

औद्योगिक वसाहतीपासून पुलगावकर वंचितच
रोजगार मिळेणा : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
पुलगाव : मुंबई, कोलकाता या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर बसलेले शहर गत पाच दशकांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. औद्योगिक विकासाच्या दृष्टीने सर्वच भौगोलिक परिस्थिती उपलब्ध असताना शहरात अद्याप औद्योगिक वसाहतीची स्थापनाही होऊ शकलेली नाही. परिणामी, बेरोजगारी वाढत असून रोजगार मिळेणासा झाला आहे. लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने रोष व्यक्त होत आहे.
शहरातून नागपूर-मुंबई हा द्रुतगती मार्ग व हैद्राबाद-भोपाल हा महामार्ग तसेच धारणी ते अहेरी हा राज्य महामार्गही गेला आहे. शहरालगतच वर्धा नदी वाहत आहे. असे असताना हे शहर औद्योगिक विकासाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिले आहे. भोसले कालीन राजवटीतून शहर व परिसराला ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व होते. भोसले व इंग्रजांना या भागाचे महत्त्व कळले म्हणून त्यांनी वर्धा नदीवर मोठा रेल्वे पूल बांधला. इंग्रज राजवटीत नागपूरच्या बुटी परिवाराला महत्त्व कळले व त्यांनी या शहरात १८८९ पुलगाव कॉटन मिल्स हा मोठा वस्त्रोद्योग सुरू केला. यानंतर याच राजवटीत १९४२ मध्ये इंग्रजांनी केंद्रीय दारूगोळा भांडाराची निर्मिती करून पुलगाव शहराच्या विकासाची दालने खुली केली. १५ आॅगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला खरा; पण हे शहर विकासात्मक बाबतीत पाच दशकांत मागेच राहिले. नवीन उद्योग तर आले नाहीच, उलट चार हजार कामगारांना रोजगार देणारा पुलगाव कॉटन मिल हा मोठा वस्त्रोद्योग लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे एक दशकापेक्षाही अधिक वर्षापासून बंद पडला आहे.
मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या बी.ई.सी. फर्टिलाइझर या खत कारखान्यालाही घरघर लागली आहे. चार महिन्यांपूर्वी शहरात मंत्री प्रविण पोटे व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आले असताना नागरिकांनी याबाबत विचारणा केली. यावर पोटे यांनी, तुम्ही जागा द्या, मी औद्योगिक वसाहत देतो, असे म्हटले होते. सत्तेत असलेल्या व्यक्तींनी अशी उत्तरे देणे योग्य आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जागेसाठी शासकीय यंत्रणा कार्यरत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)