पुलगाव तालुका; आश्वासनपूर्तीकडे लक्ष
By Admin | Updated: October 2, 2015 06:47 IST2015-10-02T06:47:09+5:302015-10-02T06:47:09+5:30
राजकीयदृष्ट्या संवेदनशील पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा द्या, औद्योगिक वसाहत स्थापन करा, ही मागणी गत तीन

पुलगाव तालुका; आश्वासनपूर्तीकडे लक्ष
प्रभाकर शहाकार ल्ल पुलगाव
राजकीयदृष्ट्या संवेदनशील पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा द्या, औद्योगिक वसाहत स्थापन करा, ही मागणी गत तीन दशकांपासून होत आहे. निवडणूक काळात विद्यमान वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आश्वासन दिले होते. ते जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. यामुळे पुलगावला तालुक्याचा दर्जा देण्याच्या आश्वासनपूर्तीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शासनाने काही जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे व तालुक्यांची निर्मिती केली; पण आश्वासनानंतरही पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा देण्यास तत्कालीन शासनाने टाळाटाळ केली. तीन दशकानंतरही पुलगाव तहसीलचा प्रश्न अधांतरीच आहे. राज्यात भाजपा सत्तेवर आल्यास पुलगाव तहसील होणार म्हणजे होणारच, ही काळ्या दगडावरची लकरी आहे, अशी जाहीर घोषणा निवडणूक प्रचार सभेत तेव्हा सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. ते विद्यमान अर्थमंत्री व पालकमंत्री आहेत. १९७८ पासून पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा द्या, ही मागणी होत आहे; पण राज्य शासन याकडे दुर्लक्षच करीत आहे. पुलगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ७८ गावांचा समावेश करून शहराला तालुक्याचा दर्जाच्या मागाणीसाठी सामाजिक, राजकीय संस्था, नगरपरिषद, ग्रा.पं., कामगार संघटनांसह विविध संस्थांनी शासनाला निवेदने दिली. या मागणीनंतर शासनाने महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांनी ५ डिसेंबर १९८८ रोजी पत्र दिले. त्यात या मागणीचा विचार पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील तालुक्यांची पुनर्रचना करताना करण्यात येईल, तूर्त ही पुनर्रचना आर्थिक कारणास्तव स्थगित ठेवण्यात आली, असे नमूद होते. सदर पत्र कक्ष अधिकारी म. दे. केदार यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले होते; पण शासनाला आपल्याच आश्वासनाचा विसर पडला. या तीन दशकांत राज्य शासनाने अनेक नवीन जिल्हे व तालुक्यांची पुनर्रचना केली. नवीन जिल्हे व तालुके निर्माण केले; पण लेखी आश्वासन देऊनही पुलगाव तालुका झालाच नाही. सर्वच भौतिक व भौगोलिक सुविधा असताना राज्य शासन पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा देण्यास टाळाटाळ का करीत आहे, असा प्रश्न पुलगावकर उपस्थित करीत आहेत. पालकमंत्री तरी आपले आश्वासन पाळून या शहराला तालुक्याचा दर्जा मिळवून देतील काय, याकडे लक्ष लागलेले आहेत.
मुख्यमंत्र्यांची घेतली होती भेट
मध्यंतरी हिवाळी अधिवेशनादरम्यान ना. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या शिष्टमंडळासह तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नागपूर मुक्कामी भेट घेत पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी रेटली होती.
शिवाय ना. मुनगंटीवार यांनीही घोषणा केली होती. आता केंद्रात व राज्यात भाजपाचे शासन आहे. त्यामुळे पालकमंत्री आपला शब्द पाळणार की फिरविणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.