भीमराव भोयर यांच्या पुस्तकाचे शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
By Admin | Updated: May 18, 2016 02:22 IST2016-05-18T02:22:38+5:302016-05-18T02:22:38+5:30
नई तालीम शिक्षण पद्धतीत जडणघडण झालेले व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित असलेले येथील आदर्श शिक्षक

भीमराव भोयर यांच्या पुस्तकाचे शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
शिक्षणवाटा चोखाळताना : ज्ञानाचा प्रवास
वर्धा : नई तालीम शिक्षण पद्धतीत जडणघडण झालेले व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित असलेले येथील आदर्श शिक्षक भीमराव भोयर यांच्या ‘शिक्षणवाटा चोखाळताना’ या अध्यापनकार्य, शिक्षण क्षेत्रातील अनुभव आणि प्रयोगशील शिक्षणाशी निगडित पुस्तकाचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते शनिवारी मुंबई येथे प्रकाशन झाले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मुख्य सभागृहात हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके, आमदार कपिल पाटील, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव, पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनचे अरुण जाखडे यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आयोजित परिसंवादात आमदार पाटील, श्याम मानव, वसंत आबाजी डहाके यांनी विचार व्यक्त केले. लेखक भीमराव भोयर यांनी त्यांच्या शिक्षणाधारित कवितेद्वारे परिसंवादाचा समारोप केला. संचालन प्रमोद चुंचूवार यांनी केले तर आभार मनोज भोयर यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)