लोकोपयोगी कार्य समाजासाठी हितकारक
By Admin | Updated: October 3, 2016 00:51 IST2016-10-03T00:51:43+5:302016-10-03T00:51:43+5:30
गरज नसलेले; पण वापरण्यास योग्य कपडे कपाटात ठेवण्यापेक्षा ते गरजूंना घालण्यास दिल्यास त्याचा सदुपयोग होतो.

लोकोपयोगी कार्य समाजासाठी हितकारक
पंकज भोयर : जनहित मंचाच्या कपडा बँकेचा शुभारंभ, गरजू गरिबांना कपड्यांचे वितरण
वर्धा : गरज नसलेले; पण वापरण्यास योग्य कपडे कपाटात ठेवण्यापेक्षा ते गरजूंना घालण्यास दिल्यास त्याचा सदुपयोग होतो. गरीब, कष्टकरी, वंचित व उपेक्षितांना जनहित मंचने कपड्यांची सोय करून लोकोपयोगी कार्य सुरू केले आहे. ते समाजासाठी हितकारक ठरेल, असे मत आ.डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केले.
जनहित मंच वर्र्धाने नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून रविवारपासून वकारे बिल्डींग पाषाण चौक, मालगुजारीपुरा येथे जनहित कपडा बँक सुरू केली आहे. या कपडा बँकेचा शुभारंभ आ.डॉ. भोयर यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्र्य अधिकारी व सोशल फोरमचे अध्यक्ष अभ्युदय मेघे, जनहित मंचचे अध्यक्ष सतीश बावसे, प्रकल्प प्रमुख डॉ. जयंत मकरंदे, उपाध्यक्ष सुभाष पाटणकर भास्कर पारखी, सहसचिव प्रमोद गिरडकर, प्रशांत वकारे उपस्थित होते.
आ. भोयर यांनी जनहित मंचने सुरू केलेल्या जनहित कपडा बँकेच्या उपक्रमाचे कौतुक केले. समाजाच्या विकासासाठी सामाजिक संघटनांची गरज आहे, असेही सांगितले. मेघे यांनी रोटी, कपडा आणि मकान या तीन गोष्टी मनुष्याला आवश्यक आहेत. त्यापैकी आजच्या फॅशनच्या दुनियेत काही दिवस कपडे वापरून टाकून दिले जातात. दुसरीकडे अनेकांच्या अंगावर कपडे नसतात. या विपरित स्थितीवर मात करण्यासाठी जनहित मंचने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असे सांगितले. वंचित व उपेक्षितांनी या योजनेचा लाभ घ्यावा. वर्धेकरांनी वर्धा स्वच्छतेकरिता सहकार्य करावे. नवरात्री उत्सवदरम्यान शहरातील दूर्गोत्सव मंडळांनी शहर स्वच्छतेकरिता नागरिकांना वेळावेळी सूचना द्यावी, असे आवाहन बावसे यांनी केले.
यावेळी आ.डॉ. भोयर यांच्या हस्ते वंचितांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख डॉ. जयंत मकरंदे यांनी केले. संचालन सुभाष पाटणकर यांनी केले तर आभार पवन बोधनकर यांनी मानले. यावेळी अनुप भुतडा, पवन बोधनकर, दिनेश रूद्रकार, पदम ठाकरे, डॉ. सतीश हरणे, अनिल नरेडी, प्रा. दिनेश चन्नावार आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)