बांधकाम कामगारांना विमा सुरक्षा द्या
By Admin | Updated: December 19, 2015 02:00 IST2015-12-19T02:00:57+5:302015-12-19T02:00:57+5:30
३१ आॅगस्ट २०१४ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व इमारत बांधकाम कामगारांना तीन हजार रुपयाचे आर्थिक अनुदाना त्वरित वितरीत करुन विमा सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी आहे.

बांधकाम कामगारांना विमा सुरक्षा द्या
मागणी : प्रलंबित मागण्या निकाली काढा
वर्धा : ३१ आॅगस्ट २०१४ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व इमारत बांधकाम कामगारांना तीन हजार रुपयाचे आर्थिक अनुदाना त्वरित वितरीत करुन विमा सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी आहे. इमारत बांधकाम करताना त्यांच्या जीविताला धोका असतो. यात दुर्घटना झाल्यास त्यांचे कुटुंब उघड्यावर येते. शासनाने याबाबत तरतुदी करण्याची मागणी वर्धा जिल्हा इमारत बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेने केली आहे.
यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे मृत्युलाभ, स्कॉलरशिप, विवाह अनुदान, प्रसूती अनुदान आदी मागण्यांवरील कागदपत्रे दोन वर्षापासून जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात प्रलंबीत आहे. ते त्वरित निकाली काढावे. तसेच ३१ आॅगस्ट २०१४ नंतर व त्यापूर्वी नोंदणी झालेल्या कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपयाचे अनुदान जाहीर करावे, प्रत्येक जिल्ह्यात इमारत बांधकाम कामगारांकरिता स्वतंत्र जिल्हा कार्यालय व कर्मचारी नेमण्यात यावे, प्रत्येक जिल्हा कार्यालयात नवीन नोंदणी प्रक्रिया त्वरित करण्यात यावी. कामगार हे अधिकारी यांच्याकडे तक्रार घेऊन गेल्यास ते आमचे काम नाही, असे सांगण्यात येते. त्यामुळे या कामगारांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. बांधकाम कामगारांना विविध कारणाखाली अडवणूक करणाऱ्या कामगार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, यासह आदी मागण्यांकरिता सोमवारी हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
निर्णयाची प्रतीक्षा
शासनस्तरावर निर्णय घेऊन बांधकाम कामगारांच्या दोन मुलींच्या विवाहाकरिता प्रत्येकी ५१ हजार रुपये अनुदान मिळावे, घर बांधण्यासाठी प्रत्येकी ५ लाख रुपये अनुदान मिळावे, राज्य मंडळाने कामगारांच्या आरोग्य, जीवन विमा चे नूतनीकरण केले नाही ते त्वरित करावे या मागण्यांचा समावेश आहे.