एसटीच्या जीवावर उठलेल्या मॅक्सीकॅबच्या परवानगीला विरोध
By Admin | Updated: December 21, 2014 23:03 IST2014-12-21T23:03:58+5:302014-12-21T23:03:58+5:30
आतापर्यंत अवैध वाहतूक म्हणून ओळख असलेल्या मॅक्सीकॅबला परवानगी देण्याच्या प्रयत्नात राज्यकर्ते आहेत. या वाहतुकीला परवानगी मिळाल्यास ती एसटीच्या मुळावर उठणारी आहे. यामुळे शासनाच्या

एसटीच्या जीवावर उठलेल्या मॅक्सीकॅबच्या परवानगीला विरोध
वर्धा : आतापर्यंत अवैध वाहतूक म्हणून ओळख असलेल्या मॅक्सीकॅबला परवानगी देण्याच्या प्रयत्नात राज्यकर्ते आहेत. या वाहतुकीला परवानगी मिळाल्यास ती एसटीच्या मुळावर उठणारी आहे. यामुळे शासनाच्या या प्रयत्नांना यशस्वी होऊ देणार नाही. या परवानगीचा महाराष्ट्र मोटार कामगार फेडरशेनच्यावतीने विरोध करण्याबाबतची चर्चा वर्धेत रविवारी झालेल्या २७ व्या त्रैवार्षिक अधिवेशनात करण्यात आली.
श्रद्धेय कै. भाऊसाहेब चंद्रायण नगरी (आकरे मंगल कार्यालय) येथे आयोजित या अधिवेशनाला केंद्रीय कामगार शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष लक्ष्मा रेड्डी, खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, माजी खासदार सुरेश वाघमारे, महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष मारोतराव झोटींग, भारतीय परिवहन मजदूर महासंघाचे अध्यक्ष चेतन देसाई, महासंघाचे प्रभारी के.पी. सिंग, महासंघाचे विदर्भ अध्यक्ष रमेश पाटील, कार्याध्यक्ष किसन सैद, मुख्य सचिव आत्माराम सातारकर, सल्लागार गोविंद राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी खासदार व आमदारांनी अधिवेशनाबाबत त्यांच्या भूमिका विषद केल्या.
या अधिवेशनात फेडरेशनशी संलग्नित सर्वच संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यात मॅक्सीकॅबच्या परवानगीचा मुख्य विषय ठरला. या व्यतिरिक्त परिवहन महामंडळ भ्रष्टाचारमुक्त करण्याकरिता काही उपाययोजना आखण्याची गरज व्यक्त करण्यात आली. आर्थिक दृष्ट्या मागास होत असलेल्या एसटीला आर्थिक पाठबळ देण्याच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. सोबतच शासनाकडे असलेली थकबाकी त्वरीत महामंडळाला परत करावी, एसटीत मान्यताप्राप्त नसलेल्या संघटनांची होत असलेली मुस्कटदाबी बंद करावी आदी विषयही यावेळी झालेल्या चर्चेत समाविष्ट करण्यात आले होते.
भारतीय मजदूर संघ संलग्नित महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाचे संचालन अरविंद बाभळे यांनी केले.
वर्धेत झालेल्या अधिवेशनाच्या आयोजनाकरिता विठ्ठल फाळके, दिलीप पंचभाई, रवी सातपुते, विलास वरघणे, प्रमोद बमनोटे, चरणदास धाणके, गजानन देवढे यांच्यासह फेडरेशनच्या इतर सदस्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)