गोरक्षकांच्या संरक्षणार्थ धरणे
By Admin | Updated: November 7, 2015 02:08 IST2015-11-07T02:08:58+5:302015-11-07T02:08:58+5:30
अवैधरीत्या होत असलेल्या गोहत्या रोखण्यासाठी विविध गो-प्रेमी संघटनाचे पदाधिकारी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून गोमातेला कत्तलखान्यात....

गोरक्षकांच्या संरक्षणार्थ धरणे
जीविताला धोका : जिल्हाधिकारी यांना निवेदनातून साकडे
वर्धा : अवैधरीत्या होत असलेल्या गोहत्या रोखण्यासाठी विविध गो-प्रेमी संघटनाचे पदाधिकारी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून गोमातेला कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवितात. मात्र गो-तस्करांकडून या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले करण्याचे प्रकार घडतात. या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याकरिता गोरक्षकांना संरक्षण देऊन उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. याकरिता शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यकर्त्यांच्यावतीने धरणे देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनानुसार, कर्नाटक राज्यात बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रशांत पुजारी यांची पशुवधगृह बंद पाडण्याच्या कारणावरुन निर्घृण हत्या करण्यात आली. हरियाणा येथील संदीप कटारिया, पुणे येथे गोरक्षक मिलिंद एकबोटे यांच्यावर आक्रमण करण्यात आले. पंजाब गोरक्षा दलाचे सतीशकुमार प्रधान यांच्यावर गोळीबार करण्यात आले. गो-तस्कर या प्रकारची गोतस्करी रोखणाऱ्या पोलिसांवर हल्ले केल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे रक्षकावर हल्ले होत असताना या गोरक्षकांना संरक्षण कोण देणार असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. याप्रकारे आक्रमणे होत असताना गोरक्षकांचे रक्षण करण्यास पोलीस पुरेसे नसल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे कायद्यानुसार गोमातेच्या रक्षणासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या या गोरक्षकांना किमान त्यांचे स्वत:चे रक्षण करता यावे, यासाठी स्वसंरक्षणार्थ उपाययोजना करण्याची मागणी केली. गोरक्षकांवर वाढती आक्रमणे रोखण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, तसेच थोर पुरूष व देवतांची चित्रे छापून प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर बंदी आणावी, यातून अवमान होत आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर राष्ट्रीय हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्ते यांनी आंदोलन केले. धरणे दिल्यावर या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.(स्थानिक प्रतिनिधी)
फटाक्याच्या उत्पादनावर बंदीची मागणी
फटाक्यांच्या वेष्टनांवर लक्ष्मी, श्रीकृष्ण, श्रीविष्णू आदी देवतांची तसेच सुभाषचंद्र बोस, भगतसिंग अशा राष्ट्रपुरुषांची चित्रे छापण्यात येते. फटाके फोडताना या चित्रांची मोठ्या प्रमाणात विटंबना होते. त्यातून धार्मिक भावना दुखावून कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. फटाक्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदूषणही होेते. प्रदुषण निर्माण करणाऱ्या आणि श्रद्धास्थानांचा अवमान करणाऱ्या या फटाक्यांवर उत्पादनावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली.