सात थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई

By Admin | Updated: February 25, 2017 00:40 IST2017-02-25T00:40:25+5:302017-02-25T00:40:25+5:30

पालिका हद्दीत येत असलेल्या अनेक मालमत्ता धारकांकडे कर थकला आहे. थकीत कराचा भरणा करण्याकरिता

Property seizure for seven defaulters | सात थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई

सात थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई

अनेकांना नोटीस : कारवाईचा बडगा सुरूच
वर्धा : पालिका हद्दीत येत असलेल्या अनेक मालमत्ता धारकांकडे कर थकला आहे. थकीत कराचा भरणा करण्याकरिता त्यांना अनेकवेळा नोटीसी बजावल्या. मात्र थकीत करदात्यांकडून याकडे दुर्लक्ष झाल्याने पालिका प्रशासनाच्यावतीने अशा थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. यात सात जणांची मालमत्ता सिल करण्यात आली आहे.
वसुली पथकाद्वारे शहरातील सैय्यद बाहुद्दीन सैय्यद करीम, जहुरूद्दीन अब्दुल रज्जाक, कालुराम विठोबा वाघमारे, वंदना पुंडलिक नखाते, सुरज पुंडलिक नखाते यांच्या मालमत्तेला सील करण्यात आले आहे. ही कार्यवाही रवींद्र जगताप, कर अधीक्षक एजाज फारूकी, मुक्कीम शेख, अशोक गायकवाड यांच्या उपस्थितीत केली. सक्तीने कर वसुली, मालमत्ता जप्तीची व नळ कपातीची कार्यवाही सतत सुरू राहणार असून यापुढे थकीत मालमत्ताधारकांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी माहितीपत्रकातून दिली.(प्रतिनिधी)

अनेक वर्षांपासून हजारो रूपयांचे भाडे थकीत
कारंजा (घा.) : कारंजा नगरपंचायतच्या अधिकार क्षेत्रात येत असलेल्या व्यावसायिक गाळेधारकांनी अनेक वर्षांपासूनच्या हजारो रुपयांचे भाडे व कर भरले नाही. टॅक्स वसुली मोहिमेंतर्गत थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करून चार व्यावसायिक गाळ्यांना कुलूप ठोकले आहे. जनहिताची अनेक मुलभूत कामे, करण्यासाठी नगरपंचायत जवळ पैसा नसल्यामुळे नाईलाजाने ही कारवाई करावी लागली, असे मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी सांगितले.
कारंजा ग्रामपंचायतने काही वर्षापूर्वी आर्थिक कमकुवत गटातील व्यावसायिकांची व्यवसाय करण्याची सोय व्हावी म्हणून एकूण खाली १६ व वर सात असे २३ गाळे बांधले होते. दरवर्षीच्या करारानुसार खालील गाळे धारकांकडून नाममात्र ७०५ व वरील गाळेधारकांकडून ४२५ रुपये भाडे ठरले. अनेकांनी राजकीय संबंध वापरून हे गाळे मिळविले. यानंतर इतरांना भाड्याने दिले. सध्या या गाळ्यात ९० टक्के दुसरेच भाडेकरू राहात आहेत. अनेकांनी कित्येक वर्षांपासून गाळ्याचे हजारो रुपयांचे भाडे भरले नाही. भाडे व टॅक्स भरण्याकरिता आतापर्यंत तीन वेळा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. पण त्या सुचनांना गाळे मालकांनी केराची टोपली दाखविली. २३ गाळेधारकांवर एकूण चार लाखाहून जास्त रुपये थकबाकी आहे. आतापर्यंत २ लाख ९० हजार वसुली करण्यात आली. तरी १ लाख वसुली अद्याप बाकी आहे. त्यांची दुकाने जप्त करण्यात आली आहेत.
गुरुवारी मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी प्रत्यक्ष गाळ्यांना भेट देवून थकबाकीदारांच्या गाळ्यांना कुलूप ठोकले. कुलूप लावतांना सुद्धा जर कुणी थकीत रक्कमेचा धनादेश दिला तर कुलूप लावण्यात येणार नसल्याचे सांगितले. या कारवाईमुळे थकीत गाळेधारकांचे धाबे दणाणले आहेत. दरवर्षी या गाळेधारकांना भाड्यासाठी दर अकरा महिन्यांनी करार करावा लागतो. शहरातील इतर नागरिकांनी १५ मार्चपर्यंत थकीत कराचा भरणा करावा असे आवाहन मुख्य अधिकारी राऊत यांनी केले आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Property seizure for seven defaulters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.