पीक कर्जाचे योग्य नियोजन करा

By Admin | Updated: May 19, 2016 01:48 IST2016-05-19T01:48:31+5:302016-05-19T01:48:31+5:30

जिल्ह्यातील सर्व पीक कर्जाला पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, ..

Proper planning of crop loans | पीक कर्जाचे योग्य नियोजन करा

पीक कर्जाचे योग्य नियोजन करा

शैलेश नवाल : जिल्हास्तरीय सल्लागार आढावा बैठक
वर्धा : जिल्ह्यातील सर्व पीक कर्जाला पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, या दृष्टीने सर्व बँकांनी नियोजन करावे. त्यासाठी मंडळस्तरावर पीक कर्ज मेळाव्यांचे आयोजन करून जनजागृती करावी. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला मॉन्सूनपूर्व हंगाम लक्षात घेऊन ३० मेपर्यंत पीक कर्जाचे वाटप करावे, अशा सूचना नव्याने रूजू झालेले जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बँक अधिकाऱ्यांना बुधवारी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अग्रणी बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समिती आणि आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय जांगडा, रिझर्व्ह बँकेच्या सहायक महाव्यवस्थापक नीता गेडाम, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस.एम. खळीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.ए. भारती, जिल्हा उपनिबंधक अजय कडू, नाबार्डच्या स्रेहल बन्सोड, सर्व बँकांचे व्यवस्थापक, समन्वयक अधिकारी, सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल पुढे म्हणाले की, मागील वर्षी सर्व बँकांनी चांगले काम केले. आता आपल्याला त्यापेक्षाही जोमाने काम करून अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ द्यावयाचा आहे. यासाठी लवकरच मंडळस्तरावर कर्ज मेळावे घेऊन पीक कर्जापासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांनाही मॉन्सून पूर्व हंगामात कर्ज उपलब्ध द्यावयाचे आहे. त्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून ३१ मे पर्यंत हस्तलिखित सातबारा उतारे देण्याची शासनाने मुभा दिलेली आहे. त्यानुसार सर्व तहसीलदारांना शेतकऱ्यांना कर्ज व अन्य शेतीविषयक कामांकरिता हस्तलिखित सातबारा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी गतवर्षीच्या कर्ज वाटपाचा आढावाही घेण्यात आला.(कार्यालय प्रतिनिधी)

७५ कोटींच्या पीक कर्जाचे वाटप
२०१६-१७ अंतर्गत खरीपासाठी जिल्ह्यातील ६ हजार ७०० खातेदारांना सर्व बॅँकांनी मिळून ७५ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती प्रारंभी जिल्हा अग्रणी बॅँकेचे जिल्हा व्यवस्थापक विजय जांगडा यांनी दिली. शिवाय मे २०१६ पर्यंत उर्वरित पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात येईल, असे प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी रिझर्व्ह बॅँकेच्या सहायक महाव्यवस्थापक नीता गेडाम यांनीही पीक कर्जाबाबत माहिती दिली.

पुढील बैठकीत गावनिहाय बॅँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे. सर्व बॅँकांनी त्या पुरवित असलेल्या सेवा क्षेत्रातील खातेदारांच्या माहितीसह उपस्थित राहावे. येणाऱ्या अडचणींबाबत अग्रणी बॅँकेचे जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी समन्वय ठेऊन अवगत करावे. केवळ उद्दीष्टावर आधारीत कामगिरी पार न पाडता उद्दीष्टाबाहेर जाऊन सामाजिक हिताच्या दृष्टीने पीक कर्जास पात्र शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या.

Web Title: Proper planning of crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.