योजनांचा प्रचार-प्रसार चलचित्ररथाद्वारे
By Admin | Updated: April 1, 2017 01:20 IST2017-04-01T01:20:05+5:302017-04-01T01:20:05+5:30
राज्यातील अनुसुचित जातींच्या नागरिकांसाठी शासन विविध योजना राबवित असून या योजनांचा प्रचार

योजनांचा प्रचार-प्रसार चलचित्ररथाद्वारे
जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
वर्धा : राज्यातील अनुसुचित जातींच्या नागरिकांसाठी शासन विविध योजना राबवित असून या योजनांचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत त्या पोहोचविण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन जिल्हा माहिती कार्यालयाचे वतीने चलचित्ररथ तयार करण्यात आला आहे. या रथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावखेड्यात विविध योजनांची जनजागृती करणार आहे.
या चलचित्ररथाला राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून हिरवी झेंडी दाखविली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांची उपस्थिती होती. सदर चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आठही तालुक्यातील अनुसुचित जातीची अधिक लोकसंख्या असलेल्या १२० गावांमध्ये २९ मार्च ते २९ एप्रिल या कालावधीत विविध योजनाचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. चलचित्रद्वारे शासनाच्या स्वच्छ भारत मिशन, जलयुक्त शिवार अभियान, कृषी विभागाच्या विविध योजना, मुद्रा बँक योजना, रोकड रहित व्यवहार, महसूल विभागाच्या विविध योजना, आरोग्य विभागाच्या विविध योजना व पशुसंवर्धन विभागाच्या अनुसुचित जातीसाठी असलेल्या विविध योजनाची चलचित्र द्वारे माहिती देण्यात येणार आहे. चित्ररथ दररोज तीन गावामध्ये सायंकाळी फिरून माहिती देणार आहे. चित्ररथ कोणत्यागावामध्ये प्रचार करीत याची माहिती प्रशासनाला मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.(शहर प्रतिनिधी)