रोजगार निर्मितीक्षम उद्योगांना प्रोत्साहन
By Admin | Updated: November 29, 2015 02:56 IST2015-11-29T02:56:36+5:302015-11-29T02:56:36+5:30
औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासास प्राधान्य देताना जिल्ह्यातील युवा उद्योजकांनी उत्पादन क्षेत्राशी..

रोजगार निर्मितीक्षम उद्योगांना प्रोत्साहन
आशुतोष सलील : जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक
वर्धा : औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासास प्राधान्य देताना जिल्ह्यातील युवा उद्योजकांनी उत्पादन क्षेत्राशी निगडीत उद्योग सुरू केल्यास त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येईल. युवकांमध्ये कौशल्य विकास, उत्पादन क्षेत्रासह आवश्यक मनुष्यबळ निर्माण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी सलील बोलत होते. बैठकीला जिल्ह्यातील उद्योजक तसेच उद्योगमित्र समितीचे सदस्य प्रवीण हिवरे, भूषण वैद्य, हरीश हांडे, बी.एम. लोमटे, एस.बी. गणराज, आर.डी भोयर, एमआयडीसीचे आमटे, एम.ए. यादव, लीड बॅकेतर्फे मुरलीधर बेलखोडे आदी उपस्थित होते.
देवळी औद्योगिक केंद्र सामूहिक सुविधा केंद्राचा विकास करणे, रस्ते, ट्रक टर्मिनल आदी सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना देताना सलील म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात ज्या उद्योजकांनी उद्योग सुरू केले नाही, त्यांनी त्वरित उद्योगाची उभारणी करावी व अहवाल सादर करावे, अशा सूचना दिल्या. देवळी औद्योगिक क्षेत्रात पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठ्याच्या प्रस्तावास त्वरित मंजुरी द्यावी. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत रोजगार निर्मिती करणाऱ्या व उत्पादन क्षेत्राशी निगडीत उद्योगांना प्राधान्य द्यावे. बँकांनीही अशा उद्योगांना कर्ज पुरवठा करावा, अशा सूचना देत उद्योजकांना आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी सांगितले. उद्योजकांनी आपले प्रश्न यावेळी मांडले.(कार्यालय प्रतिनिधी)