प्रकल्पांनी गाठला तळ; दोन कोरडे

By Admin | Updated: April 21, 2016 02:23 IST2016-04-21T02:23:52+5:302016-04-21T02:23:52+5:30

राज्यात सर्वत्र पाणीटंचाईचे काहुर माजले असताना जिल्ह्यातही पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र आहे.

Projects reached by; Two dry | प्रकल्पांनी गाठला तळ; दोन कोरडे

प्रकल्पांनी गाठला तळ; दोन कोरडे

तीन धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा : धाममध्ये पिण्याकरिता दोन महिने पुरेल एवढे पाणी
वर्धा : राज्यात सर्वत्र पाणीटंचाईचे काहुर माजले असताना जिल्ह्यातही पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र आहे. सरसकट भयावह स्थिती दिसत नसली तरी जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठला आहे. १५ पैकी दोन प्रकल्प तर कोरडे पडले असून तीन प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. वर्धा शहरासह तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धाम प्रकल्पामध्ये सध्या ११.५७ दलघमी जलसाठा आहे. या धरणातील पाणी पिण्याकरिता राखीव असून दोन महिन्यांपर्यंत नागरिकांची तहान भागविली जाऊ शकेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.
वर्धा जिल्ह्यात १५ मोठे व मध्यम प्रकल्प आहेत. या धरणांतून सिंचन, उद्योग आणि पिण्याकरिता जलसाठा राखीव केला जातो. उन्हाळ्यामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे आणि शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून जलसंचय केला जातो; पण दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने संचित जलसाठाही अपूरा ठरताना दिसतो. जिल्ह्यातील १५ प्रकल्पांपैकी पोथरा आणि पंचधारा प्रकल्प पूर्णत: कोरडे पडले आहेत. गतवर्षी २० एप्रिलपर्यंत या दोन्ही धरणांमध्ये सरासरी १.६० दलघमी जलसाठा शिल्लक होता. शिवाय डोंगरगाव, मदन आणि मदन उन्नई या तीन धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा राहिला आहे. वर्धा शहर आणि तालुक्यातील गावांना तसेच धाम नदी काठावरील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धाम प्रकल्पामध्येही दोन महिने पुरविता येईल, एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे. धाम प्रकल्पामध्ये ११.५७ दशलक्ष घनमीटर म्हणजे १९.४५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.
जिल्ह्यातील अन्य प्रकल्पांमध्येही उपयुक्त जलसाठ्यात कमालीची घट झाली आहे. यामुळे कारंजा (घा.), आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट तालुक्यातील काही गावांतील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या विहिरींनीही तळ गाठल्याने अनियमित पाणी पुरवठा होताना दिसतो. शिवाय अन्य सार्वजनिक विहिरी व हातपंपांची भूजल पातळी खालावली आहे. वर्धा तालुक्यातील सेवाग्राम, आर्वी तालुक्यातील रसुलाबाद, समुद्रपूर व पुलगाव शहरातील काही भाग, हिंगणघाट तालुक्यातील धोची, कारंजा तालुक्यातील मोर्शी यासह अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Projects reached by; Two dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.