आधी वाढीव मोबदला नंतरच प्रकल्प

By Admin | Updated: February 20, 2015 01:33 IST2015-02-20T01:33:06+5:302015-02-20T01:33:06+5:30

वर्धा नदीवरील चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ या तीन जिल्ह्याच्या सीमेवर प्रस्तावित दिंडोरा बॅरेज प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाने बुधवारला जनसुनावणी घेतली.

Projects only after higher remuneration | आधी वाढीव मोबदला नंतरच प्रकल्प

आधी वाढीव मोबदला नंतरच प्रकल्प

हिंगणघाट : वर्धा नदीवरील चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ या तीन जिल्ह्याच्या सीमेवर प्रस्तावित दिंडोरा बॅरेज प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाने बुधवारला जनसुनावणी घेतली. यावेळी प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांनी आधी शेतीचा वाढीव मोबदला द्या, नंतरच प्रकल्पाची निर्मिती, अशी भूमिका घेऊन त्यांच्या संतप्त भावना उपस्थितांसमोर मांडल्या. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
वर्धा नदीवर १ हजार ६९० हेक्टर जमीन संपादित करून बंधाऱ्याच्या निर्मितीची योजना तत्कालीन निपॉन डेन्रो वीज प्रकल्पाच्यावतीने आखली होती. काही शेतकऱ्यांच्या जमिनींना ३० ते ४० हजार रूपये एकरी भाव देवून जमिनी अधीग्रहीत करण्यात आल्या. तसेच अनेक शेतीसंबंधी अवार्ड करून देखील शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला नव्हता. यानंतर निपॉन डेन्रो प्रकल्प कार्यान्वित झाला नाही. परंतु सदर जागेवर नियोजित बंधाऱ्याची पुर्तता करण्यासाठी शासनाने विदर्भ पाटबंधारेच्या माध्यमातून दिंडोरा बॅरेज उपसा सिंचन योजना प्रस्तावित केली. निपॉन डेन्रो द्वारा संपादित जमिनीचे हस्तांतरण सुद्धा करण्यात आले. मात्र मुळ प्रकल्प रद्द झाल्याने नवीन प्रस्तावित प्रकल्पाकरिता जमीन अधिग्रहण कायद्यानुसार जमिनींचा मोबदला देण्याची मागणी प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांची आहे.
पर्यावरण विभागाच्यावतीने याबाबत बुधवारी जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, विदर्भ पाटबंधारे विभागाचे भाके, पर्यावरण विभागाच्या हेमा देशपांडे, मुंडे, उपविभागीय अधिकारी भूगावकर, तहसीलदार दीपक कारंडे आदी उपस्थित होते. जनसुनावणीला आ. समीर कुणावार यांनी उपस्थित राहून सदर प्रकल्प व्हावा, परंतु शेतकऱ्यांना मात्र शेतीचा मोबदला नियमाप्रमाणे मिळालाच पाहिजे, अशी भूमिका मांडून पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी किशोर दिघे व माजी जि.प. सदस्य प्रफुल्ल बाडे उपस्थित होते.
या जनसुणावणी दरम्यान आधी शेतीचा वाढीव मोबदला नंतरच प्रकल्पाची सुरवात, अशी भूमिका घेत तीव्र आंदोलनाचा इशारा केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचे स्वीय सहाय्यक राहुल सराफ, माजी खा. सुरेश वाघमारे, वणीचे भाजपा विधानसभा प्रमुख विजय तिजुरकर यासह पुंडलिक तिजारे, अशोक नोमुजवार, गजानन ढगे, मयूर हुमाड, राजेश भोयर आदींनी दिला. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Projects only after higher remuneration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.