प्रकल्पाच्या कालव्यांचे अस्तरीकरण होणार
By Admin | Updated: December 23, 2014 23:10 IST2014-12-23T23:10:25+5:302014-12-23T23:10:25+5:30
पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता कालव्यांना अस्तरीकरण करण्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शासनस्तरावरुन संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे.

प्रकल्पाच्या कालव्यांचे अस्तरीकरण होणार
शासनस्तरावर दखल : संबंधित यंत्रणेला आदेश
हिंगणघाट : पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता कालव्यांना अस्तरीकरण करण्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शासनस्तरावरुन संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे.
लोअरवणा प्रकल्प २५ वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आला. १९९२-९३ पासून या प्रकल्पातील पाण्याने शेतात सिंचन केले जात आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू, समुद्रपूर, हिंगणघाट तालुक्यांना तसेच नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील शेतांना या प्रकल्पातील पाणी सिंचनाकरिता उपलब्ध होते. परंतु डाव्या कालव्याला अस्तरीकरण नसल्याने साधारणत: ६० टक्के पाणी वाया जात असल्याने सिंचन क्षेत्र घट निर्माण झाली आहे.
याचा सिंचनावर विपरित परिणाम होवू नये म्हणून मिहानच्या वतीने २००७-०८ मध्ये कालव्याच्या अस्तरीकरणाकरिता सुमारे ३६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता, परंतु तत्कालीन शासनाने हा निधी कालव्याच्या अस्तरीकरणाकरिता न वापरता इतरत्र वळविल्याची तक्रार नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती.
विशेष म्हणजे याच प्रकल्पाच्या वडगाव धरणातून नागपूर येथे मिहान प्रकल्पाला सुद्धा पाणी दिल्या जाते. अस्तरीकरण न झाल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. अस्तरीकरण केल्यास पाण्याचा अपव्यय थांबून शिवारातील शेतीला सिंचन होऊ शकते. तसेच अधिक क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते.
सध्या पाण्याच्या एका आवर्तनाला एक महिना लागतो. तो कालावधी पाण्याची बचत झाल्याने पंधरवाड्यावर येईल. तसेच सध्या होत असलेली सिंचनाची तीन ते चार अवर्तने वाढून ती पाच-सहा होतील, याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवेदनाची दखल घेत तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहे. कालव्यांचे अस्तरीकरण होणार असल्याने पाण्याचा होणारा अपव्यय थांबणार असून सिंचनाला फायदा होणार आहे. मात्र याची अंमलबजावणी केव्हा होणार याकडे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)