प्रकल्प झाला; पण पाणी आलेच नाही

By Admin | Updated: December 16, 2015 02:23 IST2015-12-16T02:23:44+5:302015-12-16T02:23:44+5:30

प्रकल्पाच्या निर्मितीकरिता १५ वर्षांपूर्वी शेती संपादित केली. हेक्टरी २० हजार रुपये मोबदला दिला. प्

Project is done; But there is no water | प्रकल्प झाला; पण पाणी आलेच नाही

प्रकल्प झाला; पण पाणी आलेच नाही

कार प्रकल्पग्रस्तांची व्यथा : रस्ते गेल्याने कालव्यातूनच काढावी लागतेय वाट
अमोल सोटे  आष्टी (श.)
प्रकल्पाच्या निर्मितीकरिता १५ वर्षांपूर्वी शेती संपादित केली. हेक्टरी २० हजार रुपये मोबदला दिला. प्रकल्प पूर्णत्वास गेला व कालव्याच्या कामांना सुरूवात झाली; पण अद्याप पाणी पोहोचलेच नाही. वाढीव मोबदलाही देण्यात आला नाही. प्रकल्पबाधित युवकांना नोकरीही देण्यात आली नाही. आता आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, ही व्यथा ‘लोकमत’कडे कथन करताना शेतकऱ्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली असता प्रकल्पग्रस्तांच्या वेदना समोर आल्या.
आष्टी व कारंजा (घाडगे) या दोन तालुक्याच्या सीमेवर सन २००० मध्ये कार प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. सिंचनाची सोय होईल म्हणून कुणीही या प्रकल्पाला विरोध केला नाही. या प्रकल्पाला सढळ हाताने शेती दिली. शासनाने हेक्टरी २० हजार रुपये मूळ मोबदला व वाढीव मोबदल्याचे २० हजार एवढेच तुटपुंजे अनुदान दिले. यानंतर दोन वर्षांनी हेक्टरी ६० हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते; पण अद्यापही मोबदल्याचा पत्ताच नाही. कार प्रकल्पांतर्गत कालव्यांचे बांधकाम हाती घेण्यात आले. यासाठी मौजा माणिकवाडा व कोल्हाकाळी येथील सुमारे २७० हेक्टर शेती संपादित करण्यात आली. कालव्यांचे खोदकाम करण्यात आले; पण त्याचे सिमेंटीकरण करण्यातच आले नाही. प्रकल्पाच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाल्याने एवढा निधी देणे शक्य नाही, असा निर्वाळा शासनाने दिला. परिणामी, शेतामध्ये पाण्याची सोय होऊ शकली नाही.
पिकाचे भरघोस उत्पादन देणारी शेती हातातून गेल्याने शेतकरी हतबल झाले. आता शासनाने सिंचनाची व्यवस्था लवकर करावी, अशी माफक अपेक्षा करण्यात येत होती; पण शासनाने त्याकडेही साफ दुर्लक्ष केले. शेतातून ये-जा करण्यासाठी अस्तित्वात असलेले चांगले रस्ते कालव्यांमध्ये गेले. यामुळे शेतकऱ्यांना कालव्यातूनच वाट काढत ये-जा करावी लागत आहे. संवेदना बोथट करून प्रकल्पाची वाट लावण्याचे काम शासनाने केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कार प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून अनेकदा उपोषण व आंदोलने करण्यात आली; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मौजा कोल्हाकाळी येथील मोहन मानमोडे, प्रकाश कालभूत, उमराव कालभूत, हेमराज मानमोडे, प्रभाकर कालभूत, सुखेदव बारंगे, राजकुमार मानमोडे, प्रकाश बारंगे, राजकुमार मानमोडे, मंगेश मानमोडे, गुणवंत मानमोडे, प्रमोद कालभूत, किशोर मानमोडे, या शेतकऱ्यांनी मुख्य कालव्यामधून शेतावर ये-जा करण्यासाठी रस्ता केला आहे. पावसाळ्यात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होते. गत अनेक वर्षांपासून सातत्याने कष्ट सुरू आहे. पाणी सोडायचे नव्हते तर कालवा कशाला केला, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. या भागातील कापूस, सोयाबीन, संत्रा पिकाच्या विक्रीसाठी ये-जा करायलाही रस्ता नाही. डोक्यावर ओझे वाहावे लागते. याचे सोयरसुतक शासनाला नाही. याकडे लक्ष देत रस्त्याची समस्या त्वरित मार्गी लावून सिंचनासाठी पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबबात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना निवेदनही पाठविले आहे.

प्रकल्पग्रस्त बेरोजगार युवकांना रोजगाराची प्रतीक्षा
प्रकल्पासाठी जमिनी घेतलेल्या शेतकऱ्यांच्या बेरोजगार मुलांना नोकरी देण्याची तरतूद आहे; पण कुठल्याही प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांच्या मुलांना आजपर्यंत नोकरी मिळालेली नाही. कार प्रकल्पातील बाधितांनाही अद्याप योग्य मोबदलाही देण्यात आला नाही आणि नोकरीही मिळाली नाही. बेरोजगार युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना शासन, प्रशासन हात वर करीत असल्याचेच दिसून येते. प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत नोकरी देऊ, अशी ग्वाही शासनामार्फत देण्यात आली होती. तशी तरतूदही आहे; पण यावर अंमलच होत नसल्याची खंत शेतकरी बोलून दाखवितात. वय निघून गेल्यामुळे अनेक युवकांना नोकरी तर नाहीच; पण स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी पैसाही जवळ नाही. यामुळे ते खितपत जगत असल्याचेच दिसून येत आहे. शासनाने या प्रकल्पग्रस्त नागरिकांना प्रत्येकी २५ लाख रुपये द्यावे, अशी मागणी कार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Project is done; But there is no water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.