ग्राहक शिक्षण व तक्रार निवारण शिबिरातून समस्यांचा निपटारा
By Admin | Updated: February 10, 2016 02:43 IST2016-02-10T02:43:03+5:302016-02-10T02:43:03+5:30
अनेकदा व्यवहारात ग्राहकांची कंपन्यांद्वारे आर्थिक लूट होते. दाद मागण्याचा प्रयत्न केल्यास बहुधा ग्राहकांच्या पदरी निराशा येते.

ग्राहक शिक्षण व तक्रार निवारण शिबिरातून समस्यांचा निपटारा
पत्रपरिषद : एम.एस. कामत यांची माहिती
वर्धा : अनेकदा व्यवहारात ग्राहकांची कंपन्यांद्वारे आर्थिक लूट होते. दाद मागण्याचा प्रयत्न केल्यास बहुधा ग्राहकांच्या पदरी निराशा येते. यामुळे ग्राहकांना जागरुक व सक्षम करून होईल ती मदत करण्याच्या उद्देशाने कन्झुमर गाईडेंस सोसायटी आॅफ इंडिया मुंबई या संस्थेद्वारे १७ फेब्रुवारी रोजी ग्राहक तक्रार निवारण शिबिर घेण्यात येत आहे.
श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय पिपरी (मेघे) येथे सदर शिबिर आयोजित असल्याची माहिती संस्थेचे सचिव डॉ. एम.एस. कामत यांनी दिली. शिबिरात ग्राहक जागृती, सक्षम अधिकाऱ्यांकडे तक्रार कशी दाखल करावी, ग्राहक न्यायालय, माहितीच्या अधिकाराचा कायदा, अन्न व दुधाची भेसळ, तेल/वनस्पती तेल वापरण्याचे दुष्परिणाम, साबन आणि डिटर्जेंट, सौंदर्य प्रसाधने, संपत्ती, दूरसंचार, वीज वितरण, विजेची उपकरणे, वीमा, बँक, को-आॅपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी, स्टॉक एक्सचेंज, विमान व रस्ते वाहतूक आदी तक्रारींचे निवारण शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे केले जाईल. पत्र परिषदेला डॉ. संजय भार्गव, डॉ. कालभूत, अतुल शर्मा आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)