वाढत्या लोकसंख्येने समस्येत भर

By Admin | Updated: July 15, 2014 00:10 IST2014-07-15T00:10:33+5:302014-07-15T00:10:33+5:30

देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे आर्थिक, सामाजिक समस्यात वाढ होऊन पर्यावरण विषयक असंतुलन झाले आहे. यामुळे अनेक समस्यांना देशाला तोंड द्यावे लागते. लोकसंख्या

Problems with increasing population | वाढत्या लोकसंख्येने समस्येत भर

वाढत्या लोकसंख्येने समस्येत भर

वर्धा : देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे आर्थिक, सामाजिक समस्यात वाढ होऊन पर्यावरण विषयक असंतुलन झाले आहे. यामुळे अनेक समस्यांना देशाला तोंड द्यावे लागते. लोकसंख्या नियंत्रणाकरिता जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि संस्था यांनी उत्कृष्ठ कार्य केले आहे, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे यांनी केले.
जिल्हा परिषद सभागृहात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित आनंदीबाई पुरस्कार योजनेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी आरोग्य समिती सभापती प्रा. उषाकिरण थुटे, महिला बालकल्याण सभापती निर्मला बिजवे, समाजकल्याण सभापती नंदकिशोर कंगाले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मिलींद सोनोने, डॉ. अजय डवले, धैर्यशील जगताप, मनोज चांदूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानंतर बोलताना थुटे म्हणाल्या, देशाची लोकसंख्या वाढल्यामुळे कृषीविषयक अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे बेरोजगारी व गुन्हेगारी यात वाढ झाली आहे. तसेच डॉ. चव्हाण यांनी जिल्ह्याने कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामुळेच या कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांपासून अन्य कर्मचारी पे्ररणा घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवेत उत्कृष्ठ कार्य केल्याबाबत ग्रामीण रुग्णालय, पुलगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र खरांगणा(मो.), साहूर, गौळ, आरोग्य उपकेंद्र पेठ, बेढोणा, जऊरवाडा तसेच ७८ आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना आरोग्य मित्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी एका मुलीवर शस्त्रक्रिया करवुन घेणाऱ्या दांपत्यांचा साडी, चोळी व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार प्राप्त ग्रामीण रुग्णालय, पुलगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र साहूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल नारलवार, डॉ. भागवत राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन राजीव देशपांडे यांनी केले तर आभार डॉ. अजय डवले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Problems with increasing population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.