ग्रामपंचायतींमध्ये समस्यांची बजबजपुरी

By Admin | Updated: November 2, 2014 22:46 IST2014-11-02T22:46:28+5:302014-11-02T22:46:28+5:30

तालुक्यात बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. स्वच्छतेचा अभाव असल्याने मलेरिया, डेंग्यू, टाईफाईड, कावीळ या आजाराच्या रूग्णात वाढ झाली आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे

Problems in Gram Panchayats | ग्रामपंचायतींमध्ये समस्यांची बजबजपुरी

ग्रामपंचायतींमध्ये समस्यांची बजबजपुरी

सेलू : तालुक्यात बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. स्वच्छतेचा अभाव असल्याने मलेरिया, डेंग्यू, टाईफाईड, कावीळ या आजाराच्या रूग्णात वाढ झाली आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे. ब्लिचिंगविना पाण्याचा पुरवठा होत आहे. वृक्षसंवर्धन योजनेचा बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी बोगस मजुरांची प्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये समस्यांची बजबजपुरी निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच पहात असला तरी आर्थिक खर्च करण्याचे अधिकार ग्रामसेवकांना असतात. त्यामुळे अनेकदा सरपंचाला हाताशी घेऊन ग्रामसेवकांकरवी आर्थिक व्यवहार केले जातात. त्यामुळे दोघांनाही गावाच्या समस्यांचा विसर पडतो. काही सरपंच सहीपुरतेच असल्याने ग्रामसेवकांची चांगली मज्जा सुरू असल्याचे चित्रही अनेक ग्रामपंचायतमध्ये दिसते
पंचायत समिती स्तरावरची यंत्रणा ग्रामसेवकांभोवती फिरत असते. त्यामुळे बरेचदा झालेला भ्रष्टाचार झाकल्या जातो. त्यामुळे ग्रामस्थांना ब्लिचिंगविना दररोज पाणी पिण्याची वेळ आल्याचेही ग्रामस्थांमधून संतापाने बोलल्या जात आहे. गावांतील नाल्यांमध्ये नियमित फवारणी केल्या जात नाही. गोदरीमुक्त योजनेचा फज्जा उडाला असून उघड्यावर घाण दिसते. लोकांनी ओरडूनही उपयोग होत नसल्याचे ग्रामीण भागातील वास्तव आहे.
वृक्षलागवड व संवर्धनाचा तर पुरता बोजवारा उडाला आहे. वृक्षसंवर्धनासाठी असणाऱ्या मजुरांना कामाचा मोबदला दिल्या जात असला तरी कधीही कामांवर नसणाऱ्यांची नावे भरून त्यांच्या नावावर मजुरी काढल्या जात असल्याची अनेक प्रकरणे पहावयास मिळतात. बँकेत मजुरांच्या नावे रक्कम जमा होते. त्यामुळे या बोगस मजुरांना काही रक्कम देवून तत्पूर्वीच त्यांचे बँकेचे पासबुक जवळ ठेवून त्यांना सोबत नेवून त्यांच्याच स्वाक्षरीने मजुरीची रक्कम उचलल्या जात असल्याचे वास्तव आहे. प्रशासनाने तालुकास्तरावरील यंत्रंएद्वारे गावांमध्ये जावून बोगस हजेरी रजिस्टर तपासून बोगस मजूरांचा शोध घेण्याची मागणी होत आहे. तसेच ग्रामसेवक दोषी आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी जोर धरत आहे. एकंदरित ग्रामपंचायतकडे तेथील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्वच्छतेचा पर्यायाने आरोग्यव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वृक्षसंवर्धन योहनेचेही तीनतेरा वाजले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांचा तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गावांतील नागरिकांकडून जोर धरत आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Problems in Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.