विस्तार अधिकाऱ्यापुढे वाचला समस्यांचा पाढा
By Admin | Updated: October 19, 2015 02:21 IST2015-10-19T02:21:08+5:302015-10-19T02:21:08+5:30
नजीकच्या आमगाव (मदनी) गट ग्रामपंचायतच्या मदनी गावात समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे.

विस्तार अधिकाऱ्यापुढे वाचला समस्यांचा पाढा
कार्यवाहीकडे लक्ष : प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घेतल्या समस्या
आकोली : नजीकच्या आमगाव (मदनी) गट ग्रामपंचायतच्या मदनी गावात समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे. असे असताना ग्रामपंचायत प्रशासन या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशीत होताच विस्तार अधिकारी आर.डी. कांबळे यांनी गावाला भेट देऊन समस्यांची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी समस्याचा पाढा वाचला.
गावातील सांडपाण्याच्या नाल्या तुंबल्या आहे. नालीत पाणी साचल्याने गवत उगवले आहे. बंधाऱ्यात सांडपाणी सोडण्यात येत असल्याने पिण्याचे पाणी वापरण्यायोग्य राहिलेले नाही. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याची दखल घेत विस्तार अधिकारी कांबळे यांनी गावाला प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी गावात प्रवेश करताच ग्रामपंचायत सदस्य प्रमोद मानकर तसेच ग्रामस्थ नितीन दिघडे, चेतन गुळघाणे, मोहन भोंडे, विवेक दिघडे, धनराज गावंडे, बंडु खेडकर, अभिजीत दिघडे, महेश दिघडे यांनी गावातील असुविधेबाबत विस्तार अधिकारी कांबळे यांना माहिती दिली. ग्रामस्थांनीही यावेळी समस्यांचा पाढा वाचला. बंद असलेले पथदिवे, सांडपाणी, नाल्याची झालेली दैना, पिण्याचे दूषित पाणी या समस्यांबाबत अवगत केले.(वार्ताहर)