आर्वी नाका चौकात अतिक्रमणामुळे अडचणी
By Admin | Updated: November 21, 2015 02:33 IST2015-11-21T02:33:58+5:302015-11-21T02:33:58+5:30
आर्वी नाका परिसरातील मुख्य चौकात सुखकर्ता कॉम्प्लेक्ससमोर काही भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे.

आर्वी नाका चौकात अतिक्रमणामुळे अडचणी
हटविण्याची मागणी : व्यापारी त्रस्त
वर्धा : आर्वी नाका परिसरातील मुख्य चौकात सुखकर्ता कॉम्प्लेक्ससमोर काही भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या कॉम्प्लेक्समधील व्यापारी वर्गाला त्रास सहन करावा लागतो त्यामुळे सदर अतिक्रमण हटविण्याची मागणी केली जात आहे.
आर्वी नाका परिसरातील मुख्य चौकात सुखकर्ता कॉम्प्लेक्समध्ये अनेकांची व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. परंतु कित्येक दिवसांपासून या दुकानांसमोर काही भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण करून लाकडी पक्के शेड उभे केले आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी या दुकानामुळे अडत आहे. तसेच सडका भाजीपाला त्याच ठिकाणी टाकत असल्याने दुर्गंधीचा सामना या परिसरातील सर्वच नागरिकांना करावा लागत आहे. परिणामी आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. अतिक्रमण धारकांनी सिग्नलला विळखा घातल्याने वळणरस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. ये जा करीत असलेले पादचारी व वाहनाना अडथळा निर्माण होत आहे. यामुळे येथे अपघाताची शक्यताही बळावली आहे.
सदर दुकानदार भाजीच्या दुकानापुढे रस्त्यावर भाजीचे ट्रे ठेवतात. त्यामुळे म्हाडा कॉलनी रोड लगतच्या वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होतो. भाजीच्या बंड्यांलगतच खाद्यपदार्थाच्याही काही बंड्या लागल्या आहेत. त्यामुळे येथे मद्यपींची गर्दी होऊन अनेकदा वादविवादही होत असतात. त्यामुळे हे अतिक्रमण त्वरीत हटवून मोकळे करावे, अशी मागणी केली जात आहे. याबाबत अनेकदा निवेदने देण्यात येऊनही याचा काहीही उपयोग होत नसल्याचे पहावयास मिळते.(शहर प्रतिनिधी)