आर्वीत व्यापाऱ्यांनी गोदाम अडविल्याने अडचण
By Admin | Updated: February 26, 2017 00:53 IST2017-02-26T00:53:22+5:302017-02-26T00:53:22+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केट यार्डवर जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून कोणतीही पूर्व सूचना

आर्वीत व्यापाऱ्यांनी गोदाम अडविल्याने अडचण
पूर्व सूचना नाही : शेतकऱ्यांचा शेतमाल येताच खरेदी झाली बंद; अनेकांनी नेला माल परत
पुरूषोत्तम नागपुरे आर्वी
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केट यार्डवर जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक शेतकऱ्यांच्या उत्पादनाची खरेदी बंद केली. यामुळे शेतकऱ्यांवर बाजारात आणलेले उत्पादन आर्थिक फटका सहन करीत परत नेण्याची वेळी आली. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या बेताल कारभाराचे शेतकऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. यामुळे ही बाजार समिती शेतकरी हिताची की, व्यापारी धार्जीनी अशी चर्चा जोर धरत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डवर खरेदी केलेल्या शेतमालाचा काटा करून व्यापाऱ्यांनी त्याची लगेच उचल करावी, असा नियम आहे. येथे हा नियम धाब्यावर बसवून येथील व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाची साठवणूक मार्केट यार्डमधील गोदामात तसाच ठेवतात. यामुळे गोदाम अडून राहत असल्याचे येथील चित्र आहे. अशातच गत काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतमालाची आवक वाढली, परिणामी शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्याकरिता जागाच शिल्लक नाही. अनेक शेतकऱ्यांनी आपली तूर उघड्यावर ठेवली. अशातच येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने कोणतीही पूर्व सूचना न देता गुरूवारपासून अचानक खरेदी बंद केली. याची माहिती नसलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करत आपला शेतमाल तसाच परत न्यावा लागला.
कृषी उत्पन्न बाजार समितीने गोदाम अडवून ठेवलेल्या व्यापाऱ्यांकडून जागा खाली करून घेतली असती तर, शेतकऱ्यांवर माल परत नेण्याची वेळ आली नसती; मात्र, आर्थिक मलाईच्या लालसेपोटी शेतकरी हितापेक्षा व्यापारी हिताला महत्त्व देण्याच्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या संतापजनक कारभाराचे शेतकऱ्यांमध्ये तीव्र पडसात उमटू लागले आहेत.
शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना लगेच मालाची उचल करण्यास भाग पाडले असते तर शेतकऱ्यांना आपला शेतमाल परत नेण्याची वेळ आली नसती. बाजार समितीने केवळ व्यापाऱ्यांचे नुकसान टाळण्याकरिता नियमला बगल दिल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. येथे जोपर्यंत व्यापाऱ्याची खरेदी पूर्ण होत नाही, तोपर्यंत तो आपला माल उचलत नाही, असे असताना बाजार समितीकडूनही त्यांच्यावर काहीच कारवाई करण्यात येत नाही. याकडे संबंधितांनी लक्ष देत संचालक मंडळाला जाब विचारण्याची वेळ आली आहे.
मार्केट यार्डवर प्रमाणापेक्षा जास्त माल झाला होता. खरेदी विक्रीचे व्यवहार करता येत नव्हते म्हणून शेतकऱ्यांनीच काही दिवस खरेदी करणे बंद ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचनेवरून एक सभा बोलवून चार दिवस खरेदी बंद ठेवण्यात आली. सोमवारपासून खरेदी सुरू होणार आहे.
- विनोद कोटेवार, सचिव, कृ.उ.बा. समिती, आर्वी.