आरोग्यासाठी सरसावला खासगी डॉक्टरांचा मंच
By Admin | Updated: June 24, 2015 02:19 IST2015-06-24T02:16:53+5:302015-06-24T02:19:51+5:30
मंगल कार्यालये, लॉन, हॉटेल तसेच कॅटरींगचा व्यवसाय करणारे रस्त्याच्या कडेला शिळे व शिल्लक अन्न टाकतात. यामुळे रस्ते ‘गार्बेज झोन’ झालेत.

आरोग्यासाठी सरसावला खासगी डॉक्टरांचा मंच
वर्धा : मंगल कार्यालये, लॉन, हॉटेल तसेच कॅटरींगचा व्यवसाय करणारे रस्त्याच्या कडेला शिळे व शिल्लक अन्न टाकतात. यामुळे रस्ते ‘गार्बेज झोन’ झालेत. पावसाळ्यात यातून विविध आजारांचा फैलाव होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत वैद्यकीय जनजागृती मंचने वर्धा-नागपूर मार्गावरील बायपास रस्त्याच्या कडेला खड्डा करून शिळे अन्न पूरले. यामुळे सदर रस्ता तुर्तास दुर्गंधीमुक्त झाला.
शहरात मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल वा कॅटरींग व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पालिकेकडून संबधितांनी परवानगी घेणे गरजेचे असते. यात शिळ्या अन्नाची विल्हेवाट कशी लावणार, त्यामुळे नागरिकांना वा शहराच्या सार्वजनिक आरोग्यास धोका होणार नाही, हे पटवून देणे गरजेचे असते; पण येथे अशी कुठलीही प्रक्रिया पार पाडली जात नसल्याचेच दिसते. यामुळेच शहराबाहेरील रस्त्यांच्या कडेला शिळे व शिल्लक अन्न टाकत असल्याचे आढळून येते. उन्ह आणि पावसामुळे हे अन्न कुजून परिसरात दुर्गंधी पसरते. यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होतो. शिवाय विविध आजारांचा फैलाव होतो. या बाबी टाळण्याकरिता शिळे अन्न उघड्यावर न टाकता ते खोल खड्डा करून त्यात पूरणे गरजेचे आहे; पण यावर कुणीही अंमल करताना दिसत नाही.
वर्धा ते नागपूर मार्गावरील बायपासच्या कडेला सर्रास शिल्लक अन्न टाकले जाते. सध्या पावसाळा असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. ही बाब लक्षात घेऊन वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे या अन्नाची विल्हेवाट लावण्याचा प्रतिकात्मक उपक्रम हाती घेण्यात आला. यात मंगळवारी बायपासच्या कडेला खड्डा करून शिळ्या अन्नाचे ढिगारे जेसीबीच्या साह्याने खड्ड्यात टाकण्यात आले. शिवाय तेथे फलकही लावण्यात आला. या उपक्रमामुळे बायपास दुर्गंधीमुक्त झाला आहे. शहरातील प्रत्येक कॅटरींग, मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल व्यावसायिकाने शिळे अन्न खड्ड्यात टाकून आजारांना आळा घालावा, असे आवाहन मंचाने केले. पालिकेने तत्सम व्यावसायिकाला शिल्लक अन्न खड्ड्यात पुरण्याची सक्ती करणे गरजेचे आहे.
या उपक्रमात वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, डॉ. यशवंत हिवंज, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, डॉ. प्रवीण सातपुते, डॉ. अमोल गाढवकर, डॉ. नितीन मेसेकर, डॉ. शंतनू चव्हाण, डॉ. सुनील अष्टपुत्रे, डॉ. शैलेंद्र कराळे यांच्यासह सदस्यांनी सहभाग घेतला.(कार्यालय प्रतिनिधी)
शिळ्या अन्नावर होऊ शकतो बायोगॅस प्रकल्प
शहरात मोठ्या प्रमाणात कॅटरींग व्यावसायिक आहेत. शिवाय मंगल कार्यालये, लॉन व हॉटेलमधूनही अन्न शिल्लक राहते. हे अन्न वापरल्यास बायोगॅस प्रकल्पाची निर्मिती करणेही शक्य आहे. नागपूर शहरात अनेक व्यावसायिकांद्वारे असे प्रकल्प उभारण्यात आले असून ते यशस्वी ठरले आहेत. यासाठी व्यावसायिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कुजलेल्या अन्नातून चांगल्या प्रतीची गॅस उपलब्ध होऊ शकते हे सिद्ध झाले आहे.
खतांची निर्मितीही शक्य
शिळे व शिल्लक राहिलेले अन्न खोल खड्ड्यात पुरल्यास काही दिवसांत त्या अन्नाचे मातीमध्ये रूपांतर होते. ही माती खत म्हणून वापरता येणे शक्य आहे. यासाठीही शहरातील तत्सम व्यावसायिकांनी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. रस्त्याच्या कडेला व कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर शिळे अन्न टाकल्यास विविध आजार पसरतात. हे टाळण्याकरिता सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.