केळी विक्रेत्याला सश्रम कारावास
By Admin | Updated: February 15, 2017 02:14 IST2017-02-15T02:14:48+5:302017-02-15T02:14:48+5:30
रसायन वापरून केळी पिकविणाऱ्याच्या प्रकरणात येथील एका विके्रत्याला एक वर्षांचा सश्रम कारावास

केळी विक्रेत्याला सश्रम कारावास
रसायनाने पिकवित होता केळी : जिल्ह्यातील तिसरे प्रकरण
वर्धा : रसायन वापरून केळी पिकविणाऱ्याच्या प्रकरणात येथील एका विके्रत्याला एक वर्षांचा सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल मुख्य दंडाधिकारी एस.एन.माने यांनी दिला. दंड न भरल्यास आरोपीला आणखी एक महिन्याची साधी शिक्षा भोगावी लागेल. शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव संजय महादेव ढोके असे असून त्याचे इतवारा बाजारात संजय महादेव ढोके फ्रुट मर्चट व कमिशन एजंट या नावाने दुकान आहे.
सविस्तर वृत्त असे की, अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत इथेनॉन या रसायनाचा केळी पिकविण्याकरिता संजय ढोके फ्रुट मर्चट व कमिशन एजंट, इतवारा येथे वापर होत असल्याबाबतची माहिती तत्कालीन अन्न निरीक्षक सु.पै. नंदनवार यांना मिळाली. त्यांनी या दुकानाला भेट दिली असता तिथे प्रतिबंधीत इथेपॉन या रसायनाच्या द्रावणामध्ये कच्या केळी बुडवून त्याचा वेगळा ढीग लावल्याचे आढळून आले होते. त्यांनी या संदर्भात विचारणा केली असता त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळून आले नाही. यामुळे अधिकाऱ्यांनी पंचनामा करून या केळींचा व इथेपॉन या रसायनाचा नमुना विश्लेषणाकरिता देण्यात आला होता. विश्लेषणाअंती इथेपॉन या प्रतिबंधीत रसायनाचा वापर केळी पिकविण्याकरिता करण्यात आल्याचे प्राप्त झालेल्या अहवालातून निष्पन्न झाले. या प्रकरणात तपास, चौकशी पूर्ण करून आरोपीविरूद्ध मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यालयात अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोन खटले २०१० मध्ये दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणात न्यायाधीशासमक्ष साक्ष पुरावे नोंदविण्यात आले. सरकार आणि आरोपींच्या बाजूने युक्तिवाद करण्यात आला. या युक्तिवादातून इथेपॉन या रसायनाचा वापर केळी पिकविण्याकरिता केल्याचे निष्पन्न झाले. यामुळे संजय ढोके याला शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणात शासनाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस.डी. थूल यांनी युक्तिवाद केला. या खटल्याचा पाठपुरावा अन्न सुरक्षा अधिकारी ललीत सोयाम, रविराज धाबर्डे, एस.पी. नंदनवार यांनी केला.(प्रतिनिधी)