कृषी विकासाला प्राधान्य

By Admin | Updated: May 20, 2016 01:47 IST2016-05-20T01:47:06+5:302016-05-20T01:47:06+5:30

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत वर्धा जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. येथे पर्जन्यमानही बऱ्यापैकी आहे.

Priority of agricultural development | कृषी विकासाला प्राधान्य

कृषी विकासाला प्राधान्य

शैलेश नवाल : पिकांकरिता नाही तर उद्योग म्हणून शेती करावी
वर्धा : महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत वर्धा जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. येथे पर्जन्यमानही बऱ्यापैकी आहे. यामुळे येथे कृषी क्षेत्राचा विकास होणे शक्य आहे. असे असताना येथील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांत शेती केवळ पीक घेण्याकरिता नाही तर ती एक उद्योग म्हणून करावी, अशी मानसिकता निर्माण करण्यावर भर देणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल पत्रकार परिषदेत म्हणाले.
वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. आत्महत्यांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परावृत्त करण्याकरिता शासनाकडून विविध पॅकेज राबविण्यात आले. मात्र त्याचा कुठलाही उपयोग झाला नाही. त्या आजही सुरूच आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शासकीय मदतीपेक्षा त्यांची अपेक्षा काय याची माहिती घेत त्यांना तशी मदत देण्यासंदर्भात शासनाच्या वरिष्ठांशी बोलण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही नवाल यावेळी म्हणाले.
वर्धा जिल्ह्यात येवून पाच ते सहा दिवसांचा कालावधी झाला आहे. जिल्ह्याचा अद्याप पुरता अभ्यास झालेला नाही; मात्र आतापर्यंत ज्या भागात काम केले तो पाण्याचे दुर्भिक्ष असलेलाच होता. या भागात पाण्याची विशेष टंचाई नाही. शिवाय पर्जन्यमानही चांगले आहे. असे असताना शेतकऱ्यांकडून केवळ दोनच उत्पन्न घेण्यात येत आहे. त्यांचा पीक घेण्याचा कालावधी अधिक आहे. कमी कलावधीत उत्पन्न घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढविण्याकरिता प्रयत्न आहे, शिवाय शक्य असल्यास इतर उद्योगही शेतकऱ्यांनी करावे या बाबतही त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल.
खरीप हंगाम तोंडावर आहे. यामुळे शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देण्याकरिता बैठक घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणासंदर्भात अडचणी येत असल्याने जिल्ह्यात कर्ज मेळावे घेण्याचे प्रस्तावित आहेत. या मेळाव्यात शेतकऱ्यांना कर्ज देण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येईल. एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्ह्यातील बँक व्यवस्थापकांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या व्यतिरिक्त विचाराची प्रगती साधण्यावरही भर देण्यात येईल, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून थेट नागरिकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्याचाही प्रयत्न करण्यात आहे. यासह रखडलेला गांधी फॉर टुमारो, या प्रकल्पाचा अभ्यास करून त्याच्या कमालाही प्राधान्य देण्याचा प्रयत्न आहे.(प्रतिनिधी)

लोकसहभागाशिवाय कुठलाही विकास अशक्य
विकास साधायचा असल्यास लोकसहभाग महत्त्वाचा आहे. शासकीय यंत्रणा केवळ योजनेची अंमलबजावणी करणारी आहे; मात्र ते काम आपले आपल्या गावाचे अशी भावना जो पर्यंत नागरिकांत रूजल्या जात नाही, तोपर्यत विकास साधणे अशक्य असल्याचेही ते म्हणाले. विकास कुठलाही असो तो लोकसहभागाशिवाय शक्य नसल्याचेही ते म्हणाले.
वर्धेत येण्यापूर्वी ज्या भागात कार्य केले त्या भागात शिक्षणक्षेत्राकडे विशेष लक्ष होते. येथेही शिक्षणाच्या विकासाकडे लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले; मात्र जिल्ह्यातील शिक्षण विभाग वरिष्ठ अधिकाऱ्यांसह त्यांच्या अधिनस्त शिक्षणावा विस्तार करणाऱ्या अधिकाऱ्यांची सर्वच पदे रिक्त असल्याची माहिती असल्याचेही ते म्हणाले. ही रिक्त पदे भरण्याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Priority of agricultural development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.