‘गुजरात’च्या रिकाम्या पाकिटांवर वर्ध्यात ‘प्रिंटिंग’; १४ नामांकित कंपन्यांच्या नावे बोगस बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 08:00 AM2023-06-16T08:00:00+5:302023-06-16T08:00:02+5:30

Wardha News गुजरातमधून रिकामी प्लास्टिक पाकिटे वर्ध्यातील म्हसाळा परिसरातील बोगस बियाणे तयार करणाऱ्या कारखान्यात येत होती. महाराष्ट्रातील १४ नामांकित कापूस बियाणे कंपन्यांची बनावट पाकिटे प्रिंट करून त्यात बियाणे भरून विक्री सुरू असल्याचे पुढे आले आहे.

'Printing' in Wardha on blank 'Gujarat' packets; Bogus seeds in the name of 14 reputable companies | ‘गुजरात’च्या रिकाम्या पाकिटांवर वर्ध्यात ‘प्रिंटिंग’; १४ नामांकित कंपन्यांच्या नावे बोगस बियाणे

‘गुजरात’च्या रिकाम्या पाकिटांवर वर्ध्यात ‘प्रिंटिंग’; १४ नामांकित कंपन्यांच्या नावे बोगस बियाणे

googlenewsNext

चैतन्य जोशी

वर्धा : वर्ध्यातील बनावट बियाणे विक्री प्रकरणात आता नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. गुजरातमधून रिकामी प्लास्टिक पाकिटे वर्ध्यातील म्हसाळा परिसरातील बोगस बियाणे तयार करणाऱ्या कारखान्यात येत होती. महाराष्ट्रातील १४ नामांकित कापूस बियाणे कंपन्यांची बनावट पाकिटे प्रिंट करून त्यात बियाणे भरून विक्री सुरू असल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी या कारखान्यातून ११ लाख १८ हजार १३ रुपये किमतीची विविध कंपन्यांची तब्बल १ लाख १८ हजार १३ छापील पाकिटे जप्त केली आहेत.

हा कारखाना चालविणारा मुख्य आरोपी राजू जयस्वाल हा गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील ईडर येथून कपाशीचे बनावट बियाणे आणि रिकामे पाकिटेही आणत होता. म्हसाळा येथील कारखान्यात महाराष्ट्रात परवानगी असलेल्या बियाण्यांच्या नावाची पाकिटे छापून त्यात बोगस बियाणे भरून रिपॅकिंग करून कृषी केंद्रांमार्फत शेतकऱ्यांना विकत होता. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दहा आरोपींना बेड्या ठोकल्या असून, ते सात दिवसांच्या पोलिस कोठडीत आहेत.

तीन वर्षांपासून सुरू होता काळाबाजार....

मुख्य आरोपी राजू जयस्वाल हा मागील तीन वर्षांपासून बोगस बियाणे विक्रीचा काळाबाजार करत होता. सुरुवातीला त्याने सेलू तालुक्यातील रेहकी येथून बियाण्यांची विक्री केली. प्रारंभी तो मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथून बनावट बियाणे विकत आणून रिपॅकिंग करून विकत होता. मात्र, २०२१ मध्ये त्याची ओळख वर्ध्यातील गजू ठाकरे याच्याशी झाली. त्याने राजू जयस्वाल याला अहमदाबादच्या ईडर येथील राजूभाई आणि महेंद्रभाईशी लिंक जुळवून दिली आणि तेव्हापासून गुजरातमधून वर्ध्यात बियाणे यायला सुरुवात झाली. यासाठी राजूने गजू ठाकरे याला ३.५० लाख रुपये कमिशनही दिले होते. सध्या गजू ठाकरे हा फरार असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत.

महिनाभरापूर्वी म्हसाळ्यात सुरू केला कारखाना...

आरोपी राजू जयस्वाल याने महिनाभरापूर्वी म्हसाळा येथे स्लॅबच्या कच्च्या इमारतीचे बांधकाम १५ दिवसांत पूर्ण केले आणि तेथे बोगस बियाण्यांचे रिपॅकिंग सुरू केले. मात्र, पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी भांडाफोड करून हा कारखाना उद्ध्वस्त केला.

रिपॅकिंग मशीनसह प्रिंटर, २८.२० लाखांची रोकड जप्त...

पोलिसांनी या कारखान्यातून रिपॅकिंग मशीन तसेच प्रिंटर आणि डिजिटल वजनकाटा जप्त केला आहे. प्रिंटिंगसाठी लागणारे पेंटचे डबेदेखील जप्त केले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनी पथकासह आरोपी राजू जयस्वाल याच्या रेहकी येथील घरी छापा मारून २८ लाख २० हजार रुपयांची रोख जप्त केली आहे.

बीज परीक्षण प्रयोगशाळेत पाठविले ‘सॅम्पल’....

पोलिसांनी जप्त केलेले कपाशीच्या बोगस बियाणांचे सहा नमुने नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळा आणि सीआयसीआर प्रयोगशाळेत पाठविले असल्याची माहिती आहे.

 

 

Web Title: 'Printing' in Wardha on blank 'Gujarat' packets; Bogus seeds in the name of 14 reputable companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.