उत्कृष्ठ कार्य करणाऱ्यांचा गौरव
By Admin | Updated: May 2, 2015 00:01 IST2015-05-02T00:01:47+5:302015-05-02T00:01:47+5:30
महाराष्ट्र स्थापनेचा ५५ वा वर्धापन दिन जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर शुक्रवारी साजरा झाला़ प्रभारी जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी..

उत्कृष्ठ कार्य करणाऱ्यांचा गौरव
महाराष्ट्र स्थापनेचा ५५ वा वर्धापन दिन : अपर जिल्हाधिकाऱ्यांनी केले ध्वजारोहण
वर्धा : महाराष्ट्र स्थापनेचा ५५ वा वर्धापन दिन जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर शुक्रवारी साजरा झाला़ प्रभारी जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी ध्वजारोहण करून सशस्त्र पोलीस दलाची मानवंदना स्वीकारली. यावेळी जिल्ह्याचे नाव राज्यात उंचाविणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, पोलीस उपअधीक्षक स्मिता नागने, होमगार्डचे जिल्हा समादेशक मोहन गुजरकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, उपजिल्हाधिकारी एस़बी़ जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी़एस़ बऱ्हाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एऩबी़ राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ़ नितीन निमोदिया, उपअभियंता चंद्रशेखर गिरी, महेश मोकलकर यावेळी उपस्थित होते़
कार्यक्रमाचे संचालन डॉ़ अजय येते व ज्योती भगत यांनी केले़ जिल्हा क्रीडा संकुलावर झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला शहरातील गणमान्य नागरिकासह खासगी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
अतिथींच्या हस्ते सत्कार
विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या निर्देशानुसार महसूल विभागातील क्षेत्रिय स्तरावरील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचा यावेळी जिल्हाधिकारी यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला़ यात देवळीचे तहसीलदार जितेंद्र कुवर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लघुलेखक ओंकार आमटे, सेलू तहसीलच्या तलाठी प्रणाली वावरे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे शिपाई राजेंद्र खरबडे यांचा समावेश होता़
गत दहा वर्षातील गोपनीय अहवाल, सरासरी प्रतवारी व तलाठ्यांनी केलेल्या कामाच्या मुल्यमापनानुसार आदर्श तलाठी पुरस्कारासाठी हिंगणघाट साझाचे जी़बी़ नकोरिया यांना धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरविले.
यशवंत पंचायतराज अभियान २०१५ अंतर्गत उत्कृष्ठ कार्य व जलतरण या खेळात कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे गुणवंत शाखा अभियंता अफजल मुस्तफा खान यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला़ भारत स्काऊट्स व गाईड्स राष्ट्रीय कार्यालयाच्यावतीने राष्ट्रपती पुरस्कार चाचणी शिबिरात कै़ आनंदराव मेघे विद्यालय, बोरगाव मेघे शाळेचे स्काऊटस् दर्शन अशोकराव चिलोरकर, स्वप्नील अश्वधारा खोब्रागडे या यशस्वी स्काऊटचे राष्ट्रपतीकडून प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबद्दल त्याचा गौरव करण्यात आला़
वर्धा शहराचे पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे पोलीस महासंचालक पदकाचे मानकरी ठरले. त्यांना उत्कृष्ठ सेवेबद्दल प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. जिल्हा समादेशक प्रा़ मोहन गुजरकर व स्काऊट्स चमू यांना भारत स्काऊट्स गाईड्चा राष्ट्रीय पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले़