डाळीचे भाव गगनाला
By Admin | Updated: April 25, 2016 01:59 IST2016-04-25T01:59:13+5:302016-04-25T01:59:13+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत तुरीचे उत्पन्न समाधानकारक असले तरी डाळीचे भाव मात्र गगनाला भिडले आहे.

डाळीचे भाव गगनाला
महागाईचा फटका : तूर डाळीचे वरण ताटातून हद्दपार
वर्धा : मागील वर्षीच्या तुलनेत तुरीचे उत्पन्न समाधानकारक असले तरी डाळीचे भाव मात्र गगनाला भिडले आहे. यंदा तूर डाळीचे भाव प्रतिकिलो १५० ते १८० रुपये आहे. यामुळे वाढत्या उन्हाच्या पाऱ्यासोबत सर्वसामान्यांना या भाववाढीचे चटके सोसावे लागत आहे. यामुळे ताटातून वरण हद्दपार होईल, काय अशी शक्यता वर्तविली जात आहे.
तुरीच्या डाळीसह सर्वच डाळीच्या दरात वाढ झाली आहे. यावर्षी तुरीचे उत्पादन समाधानकारक झाल्याने डाळीचे भाव कमी राहतील, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती. नवीन तूर निघताच डाळीचे भाव १०० ते १२० रूपये प्रतिकिलो होते. मात्र काही दिवसात तूर डाळीचे भाव वाढले आहे. किरकोळ बाजारपेठेत तूर डाळ १५० ते १७० रूपये किलो आहे. यावर्षी महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य नागरिक होरपळणार असल्याची स्थिती आहे. डाळीच्या वाढत्या दराने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. तूर डाळीला पर्याय ठरणाऱ्या चना डाळीचे दरही दुप्पट झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आहारातून वरण हद्दपार होणार असल्याचे दिसून येत आहे. यासह सर्व डाळीचे भाव वाढतच असल्याने स्वयंपाक घरातून डाळी बाद होण्याचे चित्र दिसून येत आहे. उन्हाच्या झळात भाज्यांचे दरही भडकले आहेत. त्यामुळे खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वरण-भातावर समाधान माणणाऱ्या गरिबांच्या ताटातील एक एक पदार्थ कमी होऊ लागला आहे. एकंदरीत उन्हाच्या झळात वाढत्या महागाईने सर्वसामान्य पुरते होरपळून निघत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)