रोहण्यात मिळतोय कापसाला आर्वीचा भाव
By Admin | Updated: December 31, 2015 02:26 IST2015-12-31T02:26:30+5:302015-12-31T02:26:30+5:30
येथील कापूस कमी भावामुळे आर्वी बाजारात जात होता. त्यामुळे होत असलेले नुकसान लक्षात घेत स्थानिक व्यापाऱ्यांनीही आर्वी एवढा भाव देणे सुरू केले आहे.

रोहण्यात मिळतोय कापसाला आर्वीचा भाव
वाहतुकीचा खर्च वाचला : रोहणा जीनमध्ये पुन्हा कापसाची आवक सुरू
रोहणा : येथील कापूस कमी भावामुळे आर्वी बाजारात जात होता. त्यामुळे होत असलेले नुकसान लक्षात घेत स्थानिक व्यापाऱ्यांनीही आर्वी एवढा भाव देणे सुरू केले आहे. त्यामुळे रोहणा येथील जीनमध्ये कापसाची आवक पुन्हा वाढत असून कापसाला वाढव दर मिळत आहे.
रोहणा परिसरातील जमिनीत उत्तम प्रतीच्या कापसाचे उत्पादन होते. तसेच येथील जीनमध्ये सर्वच आवश्यक सुविधा उपलब्ध असून गाळीच्या साठवणुकीसाठी एनसीडीसी चे मोठे गोदाम आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना स्थानिक जीनमाध्ये चांगला भाव मिळावा अशी आशा असते. यंदाही तीच आशा होती. पण यावर्षी सुरूवातीला रोहणा जीनमध्ये स्थानिक व्यापारी वर्गाने आर्वीपेक्षा ७५ ते १०० रूपयानी कमी भाव दिला. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस आर्वी बाजारात विकला. त्यामुळे स्थानिक जीनमध्ये अत्यल्प कापसाची आवक झाली. याबाबत दैनिक लोकमतमध्ये वृत्तही प्रकाशित झाले होते.
सदर बाब व्यापाऱ्यांनाही लक्षात आल्याने मागील काही दिवसांपासून स्थानिक व्यापारी कापसाला आर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात ज्या भावाने कापूस खरेदी होतो तोच भाव द्यायला लागले आहेत. परिणामी स्थानिक जीनमध्ये पुन्हा कापसाची आवक वाढली आहे. सध्या रोहण्यात ४८०० ते ४८५० भाव मिळत आहे. आतापर्यंत रोहण्याला दहा लाखापेक्षा जास्त क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.
यावर्षी कापसाचे उत्पादन ५० टक्क्यानी घटले असून पावसाअभावी फरदड कापूस निघणे शक्य नाही.
कोरडवाहू कापसाची उलंगवाडी झाली असून ओलिताच्या कापसाची जानेवारी २०१६ अखेर उलंगवाडी होणार आहे. म्हणजे शेतात आता फार कापूस शिल्लक नाही. फार थोड्या शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या आशेने कापूस साठवून ठेवला असून तोच कापूस शिल्लक आहे. त्यामुळे आता बाजारात मोठ्या प्रमाणात कापूस येण्याची शक्यता मावळली आहे. कापसाचे भाव लवकरच सहा हजार रूपये होण्याची शक्यता असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. बराच कापूस विकल्यावर कापसाचे भाव वाढत असल्याची झळ शेतकऱ्यांना मात्र सतावत आहे.(वार्ताहर)