प्रतिबंध हाच डेंग्यूवर उपाय
By Admin | Updated: August 13, 2016 00:39 IST2016-08-13T00:39:05+5:302016-08-13T00:39:05+5:30
जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने शालेय डेंग्यू जागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

प्रतिबंध हाच डेंग्यूवर उपाय
ठिकठिकाणी रॅली : आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहिमेतील संदेश
वर्धा : जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने शालेय डेंग्यू जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. १ ते १५ आॅगस्ट या कालावधीत ठिकठिकाणी जनजागृतीपर मिरवणूक काढून नागरिकांना आजाराची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय याची माहिती देण्यात येत आहे. सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग) यांच्या आदेशानुसार हा उपक्रम सुरू असून ‘प्रतिबंध हाच उपाय’ असा संदेश देण्यात आला.
या मोहिमेत शिक्षकांसाठी डेंग्यू जागृती कार्यशाळा, शास्त्रीय माहिती व प्रात्यक्षिक, विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरी, निबंध स्पर्धा, विद्यार्थ्यांना डासअळीचे प्रात्यक्षिक दाखवून घरोघरी डासअळी शोध मोहिमेत सहकार्य घेऊन कंटेनर तपासणी, दुषित कंटेनरवर करावयाची कार्यवाही, कोरडा दिवस उपक्रम व विद्यार्थ्यांमार्फत राबवायच्या योजना याची माहिती देण्यात आली. शालेय स्तरांवर डेंग्यू आजाराचा प्रसार करणारा एडीस डास, डासाच्या वाढीस कारणीभूत कंटेनर, गप्पी मासे प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छता अभियान, जनजागृती इत्यादी बाबीवर विद्यार्थ्यांची रांगोळी, वकृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना डेंग्यूबाबत आकलन परिक्षेसाठी प्रश्नावली देणे, घरोघरी डासअळी शोध मोहीम, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने दुषित कंटेनर रिकामे करणे, टेमिफॉसची कृती करणे असे उपक्रम राबविण्यात येत आहे. १५ आॅगस्ट ला स्वातंत्र्यदिनी प्रत्येक शाळेत राष्ट्रगितानंतर डेंग्यू प्रतिज्ञेचे सामुहिक वाचन करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार यांनी दिली.
निबंध, वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला स्पर्धेतील व डेंग्यू विषयक माहिती आकलन परिक्षेतील स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शालेय डेंग्यू जनजागृती मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषद सभापती वसंत आंबटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे यांनी केले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
आंजी(मो.) येथे ग्रामपंचायततर्फे मिरवणूक
आंजी(मोठी)- ग्रामपंचायत अंतर्गत आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मिरवणूक काढण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. वैद्य यांचे मार्गदर्शनाखाली गावामध्ये डेंग्यू जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यामध्ये आरोग्य सहाय्यक डी.एस. सोनवणे, आरोग्य सहाय्यक पी.टी. काळे, आरोग्य सेवक नी.वी. पवार व आरोग्यसेविका अर्चना शंभरकर उपस्थित होत्या. आदर्श विद्यालयाचे प्राचार्य अडकिने, गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्य मेहरे व शिक्षकवृंद आदींनी सहकार्य केले.(वार्ताहर)