१० टक्क्यांकरिता अध्यक्षपदावर नजरा
By Admin | Updated: February 8, 2015 23:36 IST2015-02-08T23:36:30+5:302015-02-08T23:36:30+5:30
शासकीय योजना राबविताना आलेल्या निधीतील १० टक्के वाटा योजनेकरिता निवड झालेल्या भागातील लोकप्रतिनिधीचा, असा अलिखित नियमच झाला आहे.

१० टक्क्यांकरिता अध्यक्षपदावर नजरा
पाणी पुरवठा समितीच्या गठणात गोंधळ : योजनेकरिता जिल्ह्यातील ५८ गावांची निवड
वर्धा : शासकीय योजना राबविताना आलेल्या निधीतील १० टक्के वाटा योजनेकरिता निवड झालेल्या भागातील लोकप्रतिनिधीचा, असा अलिखित नियमच झाला आहे. याच १० टक्क्यांचा लाभ मिळण्याकरिता सध्या जिल्ह्यात गोंधळ सुरू आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीकरिता गठित होणाऱ्या समितीचे अध्यक्षपद महत्त्वाचे ठरणार आहे. हेच अध्यक्षपद आपल्याला मिळावे याकरिता समितीच्या गठणाकरिता होणाऱ्या ग्रामसभेत वाद होवून सभा तहकूब होत आहेत.
जिल्ह्यातील गावांगावात नागरिकांना पाणी मिळावे याकरिता केंद्र शासनाच्यावतीने पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. सन २०१४-१५ मध्ये जिल्ह्यातील ५८ गावांत ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबविताना तिचे सर्व अधिकारी योजना राबविणाऱ्या समितीला देण्यात आले आहे. तसे शासनाचे आदेशही आहेत. याच कारणाने निवड झालेल्या गावात ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामसभा घेत पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे गठण करण्यात येत आहे.
योजनेच्या सर्व्हेसह त्याचा आराखड तयार करणे व ती राबविण्याकरिता लागणारा खर्च समितीलाच ठरवावयाचा आहे. समितीने केलेल्या सूचनेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कारणाने समितीचे अध्यक्षपद महत्त्वाचे ठरत आहे. अध्यक्षपद आपल्याकडेच असावे याकरिता गावातील काही लोकप्रतिनिधीत रस्सीखेच सुरू आहे. ग्रामसभेत समितीच्या सदस्यांची निवड झाल्यावर अध्यक्ष व सचिव पदाच्या निवडीची वेळ आल्यावर वाद झाल्याच्या घटना घडत आहे. याचे ताजे उदाहरण नाचणगाव येथील ग्रामसभा ठरत आहे. नाचणगाव येथील सिद्धधेश्वर मंदिरात शुक्रवारी (दि. ७ फेब्रुवारी) झालेल्या सभेत सदस्यांच्या निवडीपर्यंत सर्वकाम सुरळीत सुरू होते. अध्यक्ष व सचिवाच्या निवडीची वेळ येताच सदस्य आमने-सामने आले. यावेळी सदस्यांत चांगलीच हमरी-तुमरी झाली. सदस्यांत असलेला हा वाद निपटने कठीण होत असल्याने अखेर ही सभा तहकूब करण्यात आली. असे या गावात दोन वेळा घडले. जिल्ह्यातही हिच परिस्थिती आहे. (प्रतिनिधी)
योजनेचे सर्व अधिकार समितीला
निवड झालेल्या गावात पाणी पुरवठा योजना राबविताना तिचे सर्वस्वी अधिकार गठित झालेल्या समितीला देण्यात आले आहे. या समितीच्या ठरावानुसार काम होणार आहे. गावात योजना राबविताना सर्व्हे करण्यापासून तर त्याकरिता लागणारा खर्च व काम करणाऱ्या कंत्राटदाराची निवड हिच समिती करणार आहे. यात शासनाचे अभियंता केवळ गावाने ठेवलेल्या ठरावात दिलेल्या योजनेवर किती खर्च येईल याची माहिती देतील. यामुळे योजना राबविताना समितीचा अध्यक्ष हुकमी एक्का ठरणार आहे.
समितीच्या गठणाची जबाबदारी ग्रामविकास अधिकाऱ्यांवर
निवड झालेल्या गावात ग्रामसभेतून ही समिती गठित करण्याची जबाबदारी त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. समितीचे अध्यक्षपद लाभाचे ठरणार असल्याने या समितीचे गठण करणे या अधिकाऱ्यांकरिता अडचणीचे ठरत आहे.