बापूंच्या पेटी चरख्याची राष्ट्रपतींना भुरळ

By Admin | Updated: November 26, 2014 23:09 IST2014-11-26T23:09:52+5:302014-11-26T23:09:52+5:30

महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमाला भेट दिली़ आश्रमाची पाहणी करताना सुतकताई करणारे युवक पाहताच ते थबकले़ तेथेच थांबून बापूंना आवडत

President of Bapu's Chital Charkha | बापूंच्या पेटी चरख्याची राष्ट्रपतींना भुरळ

बापूंच्या पेटी चरख्याची राष्ट्रपतींना भुरळ

बापूकुटीत प्रार्थना सभा : आश्रमातर्फे महात्मा गांधींचे चरित्र
वर्धा : महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमाला भेट दिली़ आश्रमाची पाहणी करताना सुतकताई करणारे युवक पाहताच ते थबकले़ तेथेच थांबून बापूंना आवडत असलेल्या पेटी तसेच अंबर चरख्याची माहिती जाणून घेतली़ काही वेळ चरख्याजवळ थांबलेल्या राष्ट्रपतींना बापूंच्या चरख्याने भुरळच घातल्याची माहिती आश्रमचे अध्यक्ष जयवंत मठकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे बापुकूटीमध्ये आगमन होताच त्यांचे खादीची शाल व सूतमालेने स्वागत करण्यात आले़ यावेळी राज्यपाल सी़ विद्यसागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना महात्मा गांधींचे चरित्र, विनाबा भावे यांचे गीताप्रवचन, आश्रम माहिती पुस्तिका भेट देण्यात आली़ शिवाय महात्मा गांधींच्या माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकाच्या इंग्रजी भाषेतील प्रती राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांना तर ना़ गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस यांना मराठी प्रती भेट देण्यात आल्या़ यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते बकूळ वृक्षाचे रोपण करण्यात आले़
यावेळी आश्रम प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन सादर करण्यात आले़ यात २०१९ मध्ये महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आहे़ देशातील भूक, बेरोजगारी यासह गंभीर समस्या सुटाव्या म्हणून गांधी विचारांकडे देश आशेने पाहत आहे़ यासाठी पुढाकार घेऊन राष्ट्रीय स्तरावर बापूंची १५० वी जयंती कशी साजरी करता येईल, यादृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली़ निवेदनातून सांप्रदायिक सद्भावना, गोवंश, खादी ग्रामोद्योगाचे रक्षण करण्यात पुढाकार, हाच खरा कार्यक्रम ठरेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली़ तीन वर्षांपासून सुरू असलेल्या सेवाग्राम विकास आराखड्याचे काम कुठपर्यंत पोहोचले, याची माहिती आश्रम प्रतिष्ठानला मिळत नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली़ आश्रमाला भेट देण्यापूर्वी त्यांनी गांधी विज्ञान केंद्रालाही भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, माजी अध्यक्ष मा़म़ गडकरी, अशोक गिरी, कार्यालय सचिव बाबाराव खैरकार, आश्रमवासी हिरालाल शर्मा, नई तालीमचे कार्यालय सचिव डॉ़ शि़ना़ ठाकूर, सेवाग्रामच्या सरपंच रोशना जामलेकर, नई तालीम समितीचे नितीन पाटील, शोभा कवाडकर, पवनसिंग गणवार, अविनाश काकडे, नामदेव सोने, प्रशांत ताकसांडे आदी उपस्थित होते़ (कार्यालय प्रतिनिधी)
सेवाग्राम विकास आराखड्याची माहिती घेतली
महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आगमनाला ७५ वर्षांचा कालावधी झाला. यानिमित्त सेवाग्राम विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. गांधीजींच्या विचारांचा प्रसार व्हावा याकरिता आराखड्यावर सुमारे ५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना सेवाग्राम विकास आराखड्यासंदर्भात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी माहिती दिली. यावेळी त्यांना वर्धा पर्यटन हे कॉफी टेबल बुक भेट देण्यात आले.
गांधी विज्ञान केंद्रातील चिमुकल्यांचे राष्ट्रपतींकडून कौतुक
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी येथील गांधी विज्ञान केंद्राला भेट दिली. यावेळी केंद्रातील सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना सहज आणि मोजक्या शब्दात विज्ञान केंद्राची माहिती दिली. राष्ट्रपतींनीही या चिमुकल्यांचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी भवन लॉएड्स विद्यानिकेतनचा विनोद खडसे याने कार्बनडाय आॅक्साईडचा झाडावर होणारा परिणाम, स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या प्रित म्हाला याने डिसपोजल आॅफ सीएफएल, गांधी सिटीतील जान्हवी मोहोड हिने कोल्ड्रिंग या विषयावर राष्ट्रपतींना माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, ना. नितीन गडकरी, शिक्षा मंडळाचे अध्यक्ष राहुल बजाज, निरज बजाज, मिनल बजाज यांची उपस्थिती होती.

Web Title: President of Bapu's Chital Charkha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.