बियाणे, खते व पीककर्जासाठी कटिबद्ध

By Admin | Updated: April 24, 2016 02:10 IST2016-04-24T02:10:07+5:302016-04-24T02:10:07+5:30

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खतांची कुठलीही अडचण जाणार नाही. त्यांना सहजपणे बियाण्याची उपलब्धता होईल

Prepared for seeds, fertilizers and cropping | बियाणे, खते व पीककर्जासाठी कटिबद्ध

बियाणे, खते व पीककर्जासाठी कटिबद्ध

सुधीर मुनगंटीवार : खरीप हंगामाच्या नियोजनाबाबत अधिकाऱ्यांना सूचना
वर्धा: खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खतांची कुठलीही अडचण जाणार नाही. त्यांना सहजपणे बियाण्याची उपलब्धता होईल या दृष्टीने नियोजन करतानाच पीक कर्जासाठी ७०० कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार १५ मे पर्यंत सहज व सुलभपणे पत पुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी दिल्या.
विकास भवन येथे जिल्ह्याची खरीप हंगाम आढावा बैठक राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीला खा. रामदास तडस, आ. रणजीत कांबळे, आ. समीर कुणावार, आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे, सभापती श्यामलता अग्रवाल, चेतना मानमोडे, वसंतराव आंबटकर, प्रभारी जिल्हाधिकारी दीपक नलावडे, मुख्यकार्यपालन अधिकारी संजय मीना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, कृषी उपसंचालक राऊत आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात गत वर्षी सरासरी पाऊस पडला असला तरी शेतकऱ्यांना उत्पादन कमी झाले आहे. यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत असल्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे बियाणे व खताची कमतरता पडणार नाही, असे नियोजन करण्यात आले असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
हे वर्ष शेतकरी स्वाभीमानी वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करत असताना शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगताना पंतप्रधान कृषी पीक विमा योजना सर्वच पिकांना विम्याचे संरक्षण देणार आहे. पावसाचा खंड पडल्यामुळे नुकसान झाले असल्यास त्याचाही लाभ या योजनेतून मिळणार असल्याचे पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले.



कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना
वर्धा : शेतकऱ्यांना वीजजोडणी देताना कालवद्ध कार्यक्रम तयार करा, तसेच पावसाळ्यात देखभाल दुरूस्तीच्या दृष्टीने तालुका व झोन निहाय कृती आराखडा तयार करून त्याचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या.
वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्यामुळे मागेल त्याला शेततळे या कार्यक्रमामध्ये आवश्यक शेततळे निर्माण करण्यात येतील यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. जिल्ह्यातील शेतकरी खासगी सावकारांकडे जाणार नाही यासाठी बॅँकांनी सहज व सुलभपणे कर्ज पुरवठा करावा. सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात तात्काळ नियोजन करावे अशा सूचनाही बैठकीत त्यांनी उपस्थितांना दिल्या.
शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा करताना चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करून द्या. खराब बियाणे दिल्यास संबंधितांविरूद्ध कठोर कारवाई करा अशी सूचना आ. कुणावार यांनी केली. सिंचनासाठी उपलब्ध निधी खर्च होत नसल्याबाबत तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना आ. डॉ. भोयर यांनी करताच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले. सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्यामुळे यावर्षी पर्यायी पीक म्हणून तूर व इतर पिकासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना आ. कांबळे यांनी केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी प्रास्ताविकात खरीप हंगामात पिकांच्या नियोजनाची माहिती दिली. कृषी विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या घडी पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.(प्रतिनिधी)

२०१६-१७ मधील अभियान
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, राष्ट्रीय गळीत धान्य तेलताड व वृक्ष आधारित तेलबिया अभियान, जमीन आरोग्यपत्रिका वितरण अभियानांतर्गत ३१ हजार आरोग्य पत्रिकेचे लक्ष्य, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, सोयाबीन बियाण्याच्या घरगुती वापराबाबत गावनिहाय प्रशिक्षण व प्रसिद्धी, बियाणे खते व कीटकनाशके यांच्या गुणवत्ता नियंत्रणाबाबत तालुका व जिल्हास्तरावर भरारी पथकची निर्मिती, मनरेगा अंतर्गत वैयक्तिक शेतकरी लाभार्थीकरिता फळबाग योजना, ईस्त्राईल पद्धतीने संत्रा लागवड, शेतकरी गटामार्फत सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रम राबविणे. आदी विषय यात समावेशित आहेत.

Web Title: Prepared for seeds, fertilizers and cropping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.