प्रतिपंढरीत फुलला भाविकांचा मळा
By Admin | Updated: July 29, 2015 02:04 IST2015-07-29T02:04:54+5:302015-07-29T02:04:54+5:30
बोर नदी तीरावर वसलेल्या आणि प्रतिपंढरपूर म्हणून विदर्भात ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र घोराड येथे आषाढी ...

प्रतिपंढरीत फुलला भाविकांचा मळा
सेलू : बोर नदी तीरावर वसलेल्या आणि प्रतिपंढरपूर म्हणून विदर्भात ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र घोराड येथे आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी विठ्ठल रुख्माईचे दर्शन घेतले. भाविकांमुळे विदर्भाची पंढरी गर्दीने फुलून गेली होती.
दीड शतकापासून असलेल्या पंचक्रोशी प्रदक्षिणेची प्रथा आजही घोराड येथे कायम आहे. पहाटे पासूनच भाविक पाउले चालती पंढरीची वाट याचा प्रत्यय देत विठ्ठल रुख्माई देवस्थानमध्ये दर्शनासाठी येत होते. पहाटे ५ वाजता विठ्ठल रुख्माई मूर्तीची महापूजा करण्यात आली. सकाळपासून भाविक दर्शनासाठी रांगेत लागले होते. संत केजाजी महाराज व संत नामदेव महाराज यांच्याप्रती श्रद्धा असलेले असंख्य भाविक दुरवरून भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनाकरिता आले होते.
टाळ मृदगांचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगव्या पताका आणि मुखातून विठूनामाचा जयघोष करीत पंचक्रोशी दिंडीत अनेक भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. विठ्ठल रुख्माई मंदिरातून निघालेली प्रदक्षिणा दिंडी गरुड, हनुमंत, भवानी, पुंडलिक, जगदंबा माता, नामदेव महाराज समाधी, जगनाडे मंदिर, श्रीकृष्ण मंदिर या मार्गाने काही शेतातून ही दिंडी परिक्रमा पूर्ण करते. जवळपास तीन कि.मी अंतराच्या या मार्गावर ग्रामस्थांच्या वतीने जागोजागी फराळ व चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती.
दिंडीच्या स्वागतासाठी गावातील प्रमुख मार्गावर रांगोळी व फुलांच्या पाकळ्यानी सजले होते. रात्री उशिरापर्यंत मिळेल त्या वाहनांनी भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत होते.(शहर प्रतिनिधी)