जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रदक्षिणा आंदोलन
By Admin | Updated: August 9, 2016 01:20 IST2016-08-09T01:20:46+5:302016-08-09T01:20:46+5:30
जमीन अधिग्रहणाची कार्यवाही अर्धवट सोडल्यामुळे १५ वर्षांपासून अन्यायग्रस्त शेतकऱ्याला मोबदला मिळालेला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रदक्षिणा आंदोलन
१५ वर्षांपासून प्रलंबित : जमीन अधिग्रहण मोबदल्याचे प्रकरण
वर्धा : जमीन अधिग्रहणाची कार्यवाही अर्धवट सोडल्यामुळे १५ वर्षांपासून अन्यायग्रस्त शेतकऱ्याला मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे आर्वी तालुक्यातील शेतकरी प्रशांत क्षीरसागर याने सोमवारी भाजयुमोचे शहर अध्यक्ष बाळा जगताप यांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सायकल प्रदक्षिणा आंदोलन केले.
आर्वी येथील प्रशांत क्षीरसागर यांचे अर्धा एकर शेत सिंचन विभागाद्वारे काही वर्षांपूर्वी अधिग्रहीत करण्यात आले. या जमिनीवर विहीर खोदून नेरी या पुनर्वसीत गावात पाणी पुरवठ्याची तयारी सुरू केली. २००९ पासून विदर्भ पाठबंधारे विभागाने सदर जमीन आपल्या अखत्यारीत घेतली. येथे विहीर खोदून पाईप लाईनही टाकली; परंतु या विहिरीला अत्यल्प पाणी असल्याने सिंचन विभागाने दुसरीकडे पुन्हा जमीन अधिग्रहीत करून दुसरी विहीर खोदली आणि नेरी पुनर्वसन गावाला पाण्याची सोय करून दिली. यामुळे आधी अधिग्रहीत केलेले प्रशांत क्षीरसागर यांचे शेत विभागाच्या कुठल्याही कामाचे नव्हते. तरीही सिंचन विभागाने येथील अतिक्रमण कायमच ठेवले आहे.
शेत नगर पालिकेच्या हद्दीत येत असल्याने ७० ते ८० लाख रुपये मोबदला मिळणे अपेक्षीत होते. त्यामुळेच सिंचन विभाग जमीन अधिग्रहणासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला. अनेक वर्षांपासून मोबदला न मिळाल्याने यापूवी क्षीरसागर यांनी बाळा जगतापसह २२ डिसेंबर २०१५ रोजी विहिरीत उतरून आंदोलन केले होते. यावेळी प्रशासनाच्या आश्वासनामुळे सदर आंदोलन मागे घेतले होते. तरीही मोबदला न मिळाल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सायकल प्रदक्षिणा आंदोलन केले. तात्काळ मोबदला न मिळाल्यास संबंधीत विभागाविरोधात अवैध अतिक्रमणाबाबत तक्रार देण्याचा इशारा क्षीरसागर यांनी यावेळी दिला. सायकल प्रदषिणा हे अनोखे आंदोलन आज शहरात अनेकांच्या चर्चेचा विषय ठरले होते.(प्रतिनिधी)
१५ दिवसांत मोबदला देण्याचे आश्वासन
४आंदोलनाची दखल घेत प्रशांत क्षीरसागर व बाळा जगताप यांच्याशी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जमीन अधिग्रहण अधिकारी पांडे आणि विदर्भ पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी चर्चा केली. यावेळी १५ दिवसात अधिग्रहणाची अर्धवट प्रक्रिया पूर्ण करून संबंधीत विभागाद्वारे पंधरा दिवसाच्या आत मोबदला दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.