पं.स. चा कारभार जीर्ण इमारतीतून
By Admin | Updated: January 8, 2016 02:50 IST2016-01-08T02:50:56+5:302016-01-08T02:50:56+5:30
जिल्ह्यात सर्वच पंचायत समितीला नवीन इमारत मिळाल्या असताना सेलू पंचायत समितीचा कारभार मात्र जीर्ण इमारतीतून सुरू आहे.

पं.स. चा कारभार जीर्ण इमारतीतून
नवीन कार्यालयाची प्रतीक्षा कायमच : ५२ वर्षांपासून बांधकामच होईना
विजय माहुरे सेलू
जिल्ह्यात सर्वच पंचायत समितीला नवीन इमारत मिळाल्या असताना सेलू पंचायत समितीचा कारभार मात्र जीर्ण इमारतीतून सुरू आहे. तालुक्यातील गावांना निधी पुरविणाऱ्या पं.स.लाच इमारत मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राजकीय व प्रशासकीय उदासिनतेमुळे तब्बल ५२ वर्षांपासून पंचायत समितीला इमारतीची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसते.
सेलू येथे ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधकाम, तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे; पण ६२ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावांचा कारभार चालविणाऱ्या पंचायत समितीच्या जीर्ण इमारतीकडे शासनाचे लक्ष जाऊ नये, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. १ मे १९६२ मध्ये येथील पंचायत समिती अस्तित्वात आली. सेलू हिंगणी मार्गावर कोट्यवधी रुपयांची जागा आहे. त्या काळात बांधण्यात आलेले कार्यालय व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली वसाहत सध्या जीर्ण झाली आहे. निवासस्थाने पडली असून त्याची कवेलू, विटा व लाकूड चोरीला गेले आहे. केवळ कार्यालयाची इमारत कायम असली तरी तीही जीर्ण आहे.
प्रत्येक पावसाळ्यामध्ये गळती होऊ नये म्हणून या इमारतीला ताडपत्रीचा आधार घ्यावा लागतो. ७ सप्टेंबर १९६२ रोजी या पंचायत समितीला पहिले सभापती मिळाले आणि लोकप्रतिनिधींद्वारे कारभार पाहिला जाऊ लागला. आतापर्यंत १९६२ ते २०१६ दरम्यान १४ व्यक्तींनी सभापतीपद भूषविले. सेलू तालुक्यातील तीन लोकप्रतिनिधींना जिल्हा परिषदेचे चार वेळा अध्यक्षपद मिळाले. सध्या केंद्र, राज्य, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर एकाच राजकीय पक्षाची सत्ता आहे. याच तालुक्याकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद आहे. यामुळे जीर्ण झालेल्या पं.स. च्या इमारतीचे नव्याने बांधकाम होईल व चांगली इमारत मिळेल, अशी आशा तालुक्यातील नागरिकांना आहे.
पशुसंवर्धन, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, शिक्षण विभागाचे कार्यालय कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या तेव्हाच्या आणि आता जीर्ण झालेल्या निवासस्थानांतून चालविला जात आहे. २००० ते ०१ मध्ये सभापतीकरिता सुसज्ज असे निवासस्थान बांधण्यात आले होते. तेव्हापासून सहा सभापतींनी पंचायत समितीचा कार्यभार सांभाळला; पण भीमराव गोमासे यांनी केवळ दोन वर्षे या निवासस्थानाचा लाभ घेतला. १३ वर्षे या निवासस्थानाचा गोदाम म्हणूनच वापर झाला आहे. समाजकल्याण व महिला बालकल्याण योजनेंतर्गत वितरित करण्यात येणारे साहित्य ठेवण्यासाठी या निवासस्थानाचा व सभागृहाचा वापर केला जात आहे. पं.स. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर दिले जाणारे नांगर, स्प्रे-पंप, स्प्रिंकलर पाईप आदी साहित्य ठेवण्यासाठी सेलू शहरातील गोदाम किरायाने घेण्याची वेळ पंचायत समितीवर आली आहे. दहा वर्षांपूर्वी नवीन इमारतीचा पाठविलेला प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडून असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चांगल्या दिवसाचे स्वप्न दाखविणारे शासन पं.स. ते केंद्रापर्यंत असल्याने नव्या इमारत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.