पं.स. कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रतीक्षा
By Admin | Updated: October 20, 2014 23:18 IST2014-10-20T23:18:11+5:302014-10-20T23:18:11+5:30
कारंजा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने कामानिमित्त येथे दिवसाला शेकडो नागरिक येतात. विविध प्रमाणपत्र मिळविण्याकरिता पंचायत समिती कार्यालयात जावे लागते. येथील पं. स.

पं.स. कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रतीक्षा
कारंजा (घा.) : कारंजा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने कामानिमित्त येथे दिवसाला शेकडो नागरिक येतात. विविध प्रमाणपत्र मिळविण्याकरिता पंचायत समिती कार्यालयात जावे लागते. येथील पं. स. कार्यालयाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. यामुळे अनेकांना वाहन काही अंतरावर ठेऊन कार्यालयात चालत जावे लागते. केवळ १०० मीटर लांबी असलेल्या या रस्त्याचे मजबुतीकरण अनेक वर्षांपासून रखडले आहे.
नागरिकांसाठी पंचायत समिती कार्यालय महत्त्वाचे असते. परंतु येथे जाण्याकरिता धड रस्ता नाही अशी तक्रार येथे येणारे नागरिक करतात. मुख्य रस्त्यापासून पंचायत समितीकडे जाणारा रस्ता अनेक वर्षापासून दयनीय अवस्थेत आहे. मात्र याकडे अधिकारी अथवा लोकप्रतिनिधीचे लक्ष जात नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. या महत्वाच्या रस्त्यांचे बांधकाम केव्हा होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात. कारंजा शहराच्या मुख्य सिमेंट रस्त्यापासून पंचायत समितीकडे जाणारा रस्ता १०० मीटर लांबीचा आहे. पं.स. कार्यालय झाल्यापासून या रस्त्याची कोणतीच डागडूजी केली नाही. सिमेंटीकरण अथवा डांबरीकरणाचा तर पत्ताच नाही. या रस्त्यावरुन वाहने तर सोडाच साधे पायी चालणे सुद्धा कठीण आहे. रस्त्यावरील मोठ मोठे खड्डे चुकवित जावे लागते.
या रस्त्यावरून दिवसाला अधिकारी, पदाधिकारी आणि शेकडो नागरिक ये-जा करतात. या सर्वांना खड्डे चुकविण्याची कसरत करावी लागते. पंचायत समिती कार्यालयाकडे जाणाऱ्या या १०० मीटर रस्त्याचे भाग्य कधी पालटणार असा प्रश्न कारंजावासियांना पडला आहे. गावातील इतर रस्ते बांधण्यात आले. मात्र कार्यालयासमोरील हा रस्ता आजवर नव्याने बांधण्यात आला नाही. यामुळे कार्यालयापर्यंत वाहन घेऊन जाणे नागरिकांना शक्य होत नाही. या रस्त्याच्या मजबुतीकरणाची मागणी नागरिकांतून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)