शक्तिप्रदर्शनाने दिग्गजांचे नामांकन
By Admin | Updated: September 27, 2014 23:19 IST2014-09-27T23:19:22+5:302014-09-27T23:19:22+5:30
गगनभेदी घोषणाबाजी... ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीतून शक्तिप्रदर्शन करीत शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दिग्गजांसह ६६ जणांनी आपले नामांकन दाखल केले.

शक्तिप्रदर्शनाने दिग्गजांचे नामांकन
चारही मतदार संघात १०० अर्ज : रणजित कांबळे, सुरेश देशमुख, दादाराव केचे रिंगणात
वर्धा : गगनभेदी घोषणाबाजी... ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीतून शक्तिप्रदर्शन करीत शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दिग्गजांसह ६६ जणांनी आपले नामांकन दाखल केले. आतापर्यंत चारही मतदार संघात एकूण शंभर नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
१ आॅक्टोबर हा उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. शनिवारी देवळीतून काँग्रेसचे रणजित कांबळे, वर्धेतून राष्ट्रवादीचे सुरेश देशमुख, समीर देशमुख, काँग्रेसचे शेखर शेंडे, रवी शेंडे, शिवसेनेचे रविकांत बालपांडे, भाजपचे पंकज भोयर तर आर्वीतून भाजपचे दादाराव केचे यांनीही आपली उमेदवारी दाखल केली आहेत.
वर्धा मतदार संघात अखेरच्या दिवशी २३ जणांनी आपले नामांकन दाखल केले. या मतदार संघात आतापर्यंत ३३ जणांनी आपले नामांकन दाखल केले. देवळी मतदार संघात अखेरच्या दिवशी १६ जणांना आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आता २८ जणांनी आपले नामांकन दाखल केले आहेत.
आर्वी मतदार संघात १४ जणांनी जणांनी आपले नामांकन दाखल केले. आता पर्यंत २० जणांनी आपले नामांकन दाखल केले आहेत. हिंगणघाट मतदार संघात अखेरच्या दिवशी १३ जणांनी नामांकन दाखल केले आहे. यामध्ये मनसेचे अतुल वांदीले यांच्यासह विविध पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे. या विधानसभाक्षेत्रात आतापर्यंत १९ नामांकन दाखल झाले आहेत. यापैकी किती नामांकन कायम राहातात व किती परत घेतले जातात याकडे साऱ्याचे लक्ष आहे. (जिल्हा प्रतिनिधी)