जनतेचा विश्वास हीच पोलिसांची शक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:35 IST2017-09-15T23:35:04+5:302017-09-15T23:35:21+5:30
समाजात भितीयुक्त वातावरण तयार झाले आहे. आज आपल्याला एकमेकांचा विश्वास संपादन करण्याची वेळ आली आहे.

जनतेचा विश्वास हीच पोलिसांची शक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : समाजात भितीयुक्त वातावरण तयार झाले आहे. आज आपल्याला एकमेकांचा विश्वास संपादन करण्याची वेळ आली आहे. विश्वासातून माणसे जवळ येतात. नागरिकांमध्ये पोलिसांबाबत असलेला विश्वास हीच पोलिसांची खरी शक्ती असून पोलीस व जनतेत सामंजस्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत मदने यांनी केले.
जिजामाता विद्यालयात दक्ष नागरिक फाऊंडेशन पोलीस मित्र संघटनेतर्फे विद्यार्थ्यांकरिता आयोजित जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
मंचावर रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय मगर, लॉयन्स क्लबचे वरिष्ठ संचालक अनिल नरेडी, प्राचार्य सोनटक्के, दक्ष नागरिक फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश खंडार, उपाध्यक्ष इमरान राही, सचिव अंबादास जामुनकर, हरिष तांदळे, वासुदेव बोंदरे उपस्थित होते.
पुढे बोलताना मदने म्हणाले, व्यसनामुळे समाजात लुटमार, भ्रष्टाचार, मुलींची छेडखानी, चोरी, बलात्कार यासारख्या घटनांत वाढ होताना दिसून आले. समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस असले तरी त्यांना नागरिकांचे सहकार्य गरजेचे असल्याचे सांगितले. ठाणेदार विजय मगर, प्राचार्य सोनटक्के, प्रकाश खंडार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन पोलिसांना वेळोवेळी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
संचालन वाघमारे यांनी केले. आभार मोहन राईकवार यांनी मानले. यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आदींनी सहकार्य केले.