रस्त्यावर खड्डे; बसेस आल्या धक्क्यावर
By Admin | Updated: September 1, 2014 23:49 IST2014-09-01T23:49:44+5:302014-09-01T23:49:44+5:30
पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या अखत्यारितील रस्त्यांची डागडुजी करण्याचा प्रयत्न केला; पण पावसाने त्या दुरूस्तीची पोलच खोलली़ शिवाय रस्ते विकास महामंडळाचे रस्तेही उखडलेत़

रस्त्यावर खड्डे; बसेस आल्या धक्क्यावर
वर्धा : पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या अखत्यारितील रस्त्यांची डागडुजी करण्याचा प्रयत्न केला; पण पावसाने त्या दुरूस्तीची पोलच खोलली़ शिवाय रस्ते विकास महामंडळाचे रस्तेही उखडलेत़ यामुळे जिल्ह्यातील प्रमुख रस्ते खड्डेमयच दिसतात़ या खड्ड्यांमुळे होणारा त्रास आणि नुकसान मात्र परिवहन महामंडळाला सोसावे लागत असल्याचे दिसते़ खड्ड्यांच्या रस्त्यांमुळे बहुतांश बसेस धक्क्यावर आल्या असून अनेक बसेस खिळखिळ्या झाल्यात़
दुरवस्थेत असलेल्या रस्त्यांचा सर्वाधिक फटका महामंडळाच्या बसेसला बसत आहे़ गत दोन ते तीन महिन्यांत बसेस खिळखिळ्या झाल्याचे खुद्द परिवहनचे अधिकारीच सांगत असल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे़ जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव व तळेगाव, असे पाच आगार आहेत. वर्धा येथील एमआयडीसी परिसरात एक कार्यशाळा आहे. जिल्ह्यात २०० च्या वर एसटी बसेस कार्यरत आहेत़ यातील बहुतांश बसेस ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था गंभीर असल्याने खिळखिळ्या झाल्या आहेत़ हिंगणघाट तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय असल्याने व राज्य महामार्गाचीही दुरवस्था झाल्याने आगारातील २० ते २२ बसेसची अवस्था गंभीर असल्याचे सांगितले जाते़
तळेगाव व आर्वी या आगारांतील अंतर केवळ १५ किमीचे आहे. आर्वी ते पुलगाव रस्त्याची अवस्था दयनिय असल्याने या मार्गावर धावणाऱ्या जनता व जलद बसेस ‘भोपू सोडून सर्वच वाजते’, अशी झाली आहे़ आर्वी येथून वऱ्हा कुऱ्हा मार्गे अमरावती जाणाऱ्या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे़ या मार्गावर राज्य परिवहनची बस चालविणे कठीण आहे. आर्वी ते पुलगाव रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मागील वर्षी या मार्गावर बसफेरी चालवायची की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता़ काही दिवस बसेस बंदही ठेवण्यात आल्या होत्या़ यानंतर तात्पुरती डागडुजी करण्यात आली़ आता पुन्हा हा मार्ग धनोडी ते विरूळ दरम्यान तसेच पुढे खुबगावकडे नादुरूस्त झाला आहे़
तळेगाव आगाराच्या बसेस कारंजा (घा.), आष्टी या दोन तालुक्यांत धावतात. कारंजा तालुक्यात ग्रामीण रस्ते दुरवस्थेत आहेत़ आष्टी ते हातुर्णा हा रस्ता निकामीच झाल्याचे दिसते़ ३० किमीचा प्रवास करण्यास बसला तब्बल एक तास लागतो. यामुळे ग्रामीण भागातील बसफेऱ्या विलंबाने धावतात. वरूड, आर्वी, तळेगाव व हिंगणघाट आगारांच्या सदर मार्गावर धावणाऱ्या बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत.
वर्धा आगारातून सेलू, सिंदी (रेल्वे), मांडगाव मार्गे समुद्रपूर, वायगाव मार्गे हिंगणघाट बसेस सोडल्या जातात़ हे सर्व रस्ते दुरवस्थेत आहे़ वायगाव ते इंझापूर दरम्यान रस्ता खराब असल्याने हिंगणघाटसह वर्धा आगाराच्या बसेसचे नुकसान होत आहे़ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटीची प्रवासी वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली असून नुकसान सोसावे लागत आहे़ याकडे लक्ष देत रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे़(कार्यालय प्रतिनिधी)