खड्ड्यांमुळे वाढली ‘डोकेदुखी’
By Admin | Updated: February 18, 2017 01:36 IST2017-02-18T01:36:39+5:302017-02-18T01:36:39+5:30
स्थानिक सिव्हील लाईन भागातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकताच खड्डा खोदून फुटलेल्या जलवाहिनीची दुरूस्ती करण्यात आली होती.

खड्ड्यांमुळे वाढली ‘डोकेदुखी’
जिल्हा कचेरी समोरील प्रकार : वाहनचालकांना नाहक त्रास
वर्धा : स्थानिक सिव्हील लाईन भागातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकताच खड्डा खोदून फुटलेल्या जलवाहिनीची दुरूस्ती करण्यात आली होती. परंतु, त्यावेळी खोदण्यात आलेला खड्डा पाहिजे त्या प्रमाणात बुजविण्यात न आल्याने सध्या वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तेथील बघावसास मिळणारा सध्यास्थितीतील प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. परिणामी, योग्य कार्यवाहीची मागणी आहे.
स्थानिक जिल्हा कचेरीसमोरील परिसरातील जमीनीतून टाकण्यात आलेली जलवाहिनी फुटल्याने जलवाहिनीच्या दुरूस्तीकरिता मोठा खड्डा खोदण्यात आला होता. संबंधीतांनी जलवाहिनीची दुरूस्ती केल्यानंतर खोदण्यात आलेला खड्डा बुजविला. परंतु, सदर खड्डा पाहिजे त्या प्रमाणात बुजविण्यात न आल्याने त्याच ठिकाणी मोठा खड्डा तयार झाला आहे. हा खड्डा मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.
रस्त्याच्या मधोमध असलेला हा खड्डा वाहनचालकांची डोकेदुखी वाढवत आहे. वाहनचालकांना
त्याचा नाहक त्रासही सहन करावा लागत आहे. या मार्गावरून सेवाग्रामकडून वर्धेत तर वर्धेतून सेवाग्रामकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. रात्रीच्या सुमारास हा खड्डा सहज दिसून येत नसल्याने मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक अपघात घडले असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकांना कायमचे अपंगत्त्व आले असल्याचे वास्तव आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील खड्डा इतरांच्या जीवितास धोकादायक ठरत असल्याने संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देत तात्काळ तयार झालेला खड्डा व्यवस्थित रित्या बुजविण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)
रस्ता दुरूस्तीची गरज
स्थानिक गांधी पुतळा ते डॉ. आंबेडकर पुतळ्यापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या मार्गावर दिवसा व रात्री उशीरापर्यंत वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मार्गावरील खड्डे मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारे ठरत असून रस्त्याच्या दैनावस्थेमुळे वाहनचालकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांधी पुतळा ते डॉ. आंबेडकर पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करणे गरजेचे आहे.