हिवाळी पाहुण्यांनी गजबजले जिल्ह्यातील तलाव
By Admin | Updated: December 8, 2015 02:48 IST2015-12-08T02:48:03+5:302015-12-08T02:48:03+5:30
हिवाळ्यांच्या दिवसात अनेक पक्षी स्थलांतरण करतात. यातील काही पक्षी वर्धेतील विविध तलावांवर दिसत आहे. एरव्ही

हिवाळी पाहुण्यांनी गजबजले जिल्ह्यातील तलाव
वर्धा : हिवाळ्यांच्या दिवसात अनेक पक्षी स्थलांतरण करतात. यातील काही पक्षी वर्धेतील विविध तलावांवर दिसत आहे. एरव्ही शांत राहत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील बऱ्याच तलावांवर या विविधरंगी पक्ष्यांच्या किलबिलाटाने चैतन्य निर्माण झाले आहे. येथील बहार नेचर फाऊंडशेनच्यावतीने पक्ष्यांच्या नोंदी संकलनास प्रारंभ झाला आहे. त्यांच्याकडून साप्ताहिक पक्षीनिरीक्षणसोबतच सध्या विविध तलावांना भेटी देणे सुरू झाले आहे.
बर्फाच्छादित वा अतिकडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्याकरिता व खाद्याच्या शोधार्थ शीतकटीबंधीय प्रदेशातून समशितोष्ण प्रदेशात पक्षी स्थलांतर करीत असतात. हजारो किलोमीटर अंतर पार करून पक्षी नियमित वर्धा जिल्ह्यातील विविध भागात येत असल्याच्या नोंदी यापूर्वी झाल्या आहेत. जिल्ह्यातील नलदमयंतीसागर, वरूड बगाजीसागर (लोअर डॅम), धामप्रकल्प, पोथरा प्रकल्प यासह अनेक छोट्या-मोठ्या तलावावर हे पाहुणे दिसून येत आहेत.
यात प्रामुख्याने चक्रवक, स्वर्गया, चक्रांग, लालसरी, पट्टकादंब, शेंडीबदक, गढवाल, चांदी, पिवळ्या डोक्याचा परीट, कवड्या परीट, करडा परीट, शेकाटे, कंठीटिटवा, छोटा आर्ली, नदीसुरय, तुतारी, पाणलावा, मिनाखाई घार यासह रंगीत करकोचा, पांढरा शराटी, चमचा, सामान्य चिपचाप, शंकर, भारतीय पाणकावळा, बूटेड ईगल आदी विविध प्रकारचे पक्षी आढळून आले आहेत. एरव्ही समुद्रकिनाऱ्यावर आढळणारा पण स्थलांतरा दरम्यान विसावा घेतलेला काळ्या डोक्याचा कुरवची (ब्लॅक हेडेड गल) नोद येथे झाली आहे. तसेच राखी डोक्याच्या टिटवीचे (ग्रे हेडेड लॅपविंग) अवचित दर्शन झाले आहे.
बहार नेचर फाऊंडेशन गेली एक-दीड वर्षांपासून सातत्याने साप्ताहिक पक्षीनिरीक्षण हा उपक्रम राबवित आहे. या हिवाळी पाहुण्यांचा शास्त्रीय अभ्यास करण्याच्य दृष्टीने बहारने नोंदी संकलनास प्रारंभ केला आहे. या देखण्या पाणपक्ष्यांचे निरीक्षण करण्याकरिता निसर्ग प्रेमींनी-विद्यार्थ्यांनी साप्ताहिक पक्षीनिरीक्षण उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही बहार नेचर फाऊंडेशनने केले आहे.
या कामात किशोर वानखडे, रमेश बाकडे, रवींद्र पाटील, दिलीप वीरखडे, राहुल तेलरांधे, डॉ. बाबाजी घेवडे, संजय इंगळे तिगावकर, जयंत सबाणे, पराग दांडगे, दीपक गुढेकर, डॉ. जयंत वाघ, स्रेहल कुबडे, वैभव देशमुख, अविनाश भोळे, बी.एस. मिरगे, विनोद साळवे, अश्विन श्रीवास, पार्थ वीरखडे, नम्रता सबाणे, अवंतिका भोळे, सारिका मून, सारांक्ष फत्तेपुरिया, राहुल वकारे, राजदीप राठोड, दर्शन दुधाने यासह अनेक पक्षी अभ्यासकांनी परिसरातील तलावांवर पक्षिनिरीक्षणाच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.(प्रतिनिधी)